पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) पदाच्या मुख्य परीक्षेला अवघा सव्वा महिना राहिलेला असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अभ्यासक्रमामध्ये बदल केल्यामुळे उमेदवारांचे धाबे दणाणले आहे. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अभ्यासक्रमामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेले घटक आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या मुख्य परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केला आहे. यावर्षी होणाऱ्या परीक्षांपासून हे बदल लागू होणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा ८ डिसेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी अवघा सव्वा महिना राहिलेला असताना अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आल्यामुळे उमेदवार हैराण झाले आहेत.
या पदासाठीच्या मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या पेपरसाठी महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम, मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या या घटकांबरोबरच नवे चार घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. मुंबई पोलिस कायदा, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय पुरावा कायदा या घटकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मोठा आवाका असणाऱ्या घटकांचा अभ्यासक्रमात सरसकटपणे आणि आयत्यावेळी समावेश केल्याबद्दल उमेदवारांमध्ये नाराजी आहे. अभ्यासाचे नियोजन यांमुळे कोलमडणार असल्याची उमेदवारांची तक्रार आहे. ‘परीक्षेच्या आधीचा महिना हा उजळणीसाठी राखून ठेवलेला असतो. मात्र, आता या कालावधीमध्ये नव्याने चार घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याचबरोबर हे चारही घटक अभ्यासण्यासाठी खूप मोठे आहेत. त्यामुळे एका महिन्याभरामध्ये या घटकांचा अभ्यास करणे अवघड ठरणार आहे,’’ असे एका उमेदवाराने सांगितले.
याबाबत आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी सांगितले, ‘नव्याने समाविष्ट केलेले घटक हे आवश्यक आहेत. पोलिस उपनिरीक्षक होणाऱ्या प्रत्येकाने ते अभ्यासणे गरजेचे आहे. त्यामुळेच या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.’’

Story img Loader