मेंदू आणि मणक्यांच्या विकारांवरील उपचारांसाठी कार्य करणाऱ्या पुण्यातील संस्थेस आर्थिक मदत करण्यासाठी जर्मनीतील देणगीदार पुढे सरसावले आहेत. जर्मनीतील सिग्मंड आणि पेट्रा ओपेरकुक या दांपत्याने सहा महिन्यांपूर्वी पुण्यातील ‘सायनेप्स ब्रेन-स्पाईन फाउंडेशन’या संस्थेसाठी निधी गोळा करायच्या उद्देशाने जर्मनीत एका संस्थेची स्थापना केली आहे. या माध्यमातून जर्मन देणगीदार पुण्यातील संस्थेस शस्त्रक्रियांसाठीची अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देत आहेत.
सायनेप्स ब्रेन स्पाईन फाउंडेशनतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. संस्थेचे संस्थापक न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ, जर्मनीतील संस्थेचे संस्थापक ओपेरकुक दांपत्य, पुण्यातील संस्थेचे सल्लागार अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर या वेळी उपस्थित होते.
डॉ. पंचवाघ म्हणाले, ‘‘ संस्थेच्या माध्यमातून मेंदू आणि मणक्यांच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना आर्थिक मदत देण्यापेक्षा या शस्त्रक्रियांसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर गुंतवणूक केली जाते. याद्वारे या शस्त्रक्रियांचा खर्च कमी करणे शक्य होते.’’
‘न्यूरो सर्जरी पुणे डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे या वेळी उद्घाटन करण्यात आले.
——–
चौकट

‘सायनेप्स ब्रेन-स्पाईन फाउंडेशन’तर्फे रुग्णांना मेंदू आणि मणक्यांच्या विकारांबद्दल माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. रविवारखेरीज इतर दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात ९०११३३३८४१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून रुग्णांना मेंदू आणि मणक्यांच्या विकारांबद्दल मार्गदर्शन घेता येणार आहे.