निवडणुका जिंकायच्या असतील, तर केवळ पैसा असून उपयोगाचे नाही, तर महत्त्वाचे असतात कार्यकर्ते. एकेकाळी निवडणुका जवळ आल्या, की कार्यकर्ते कामाला लागायचे. त्यांचे मुख्य काम असायचे ते घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधणे आणि माहिती संकलित करणे वा जुनी माहिती अद्यायावत करणे. त्यासाठी मतदारयादी घेऊन एक हजार मतदारांसाठी एक कार्यकर्ता नेमला जायचा. त्याला म्हटले जायचे ‘हजारी कार्यकर्ता.’ हा हजारी कार्यकर्ता म्हणजे लोकप्रतिनिधींचा कणा असायचा. निवडणूक सोपी की अवघड, हे हजारी कार्यकर्त्याच्या अंदाजावर ठरायचे. आता सर्वच चित्र बदलले आहे. प्रामाणिक आणि नि:स्वार्थी वृत्तीने पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वानवा असून, काही पक्षांनी तर हजारी यंत्रणाच मोडीत काढल्यासारखी स्थिती आहे.
राजकीय पक्षांकडून वर्षानुवर्षे हजारी यंत्रणेचा अवलंब केला जातो. अंतिम मतदारयादी तयार झाल्यावर त्या यादीचा राजकीय पक्ष बारकाईने अभ्यास करत असतात. त्यानुसार विभाग, उपविभाग तयार करून एक हजार मतदारांचा एक गट तयार करतात. त्या प्रत्येक गटासाठी हजारी कार्यकर्त्याची नेमणूक केली जाते. त्या हजारी कार्यकर्त्यांकडून संबंधित मतदारांची इत्थंभूत माहिती गोळा केली जाते. संबंधित मतदार हे त्या ठिकाणी राहायला आहेत की नाहीत, एखादा मतदार हा मयत झाला आहे का, परदेशात गेला आहे का आदी माहिती घेतली जाते. संबंधित मतदारांचा पक्षाविषयी असलेला दृष्टिकोन किंवा मतदार कोणत्या विचारसरणीचे आहेत, याचाही अंदाज हजारी कार्यकर्ते घेत असतात. ही सर्व माहिती पक्ष किंवा उमेदवाराला दिली जाते. त्यातून पक्ष किंवा उमेदवाराला हमखास मिळणाऱ्या मतांचे गणित आखले जाते. त्यामुळे हजारी कार्यकर्ता हा पक्ष किंवा उमेदवाराच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्याच्या माहितीच्या आधारे उमेदवारांना रणनीती ठरविणे सोपे होते. त्यामुळे हजारी कार्यकर्त्याकडून किती अचूक माहिती मिळविली जाते, यावर उमेदवाराचे यश, अपयश काही प्रमाणात अवलंबून असते. सध्या काही मोजकेच पक्ष या हजारी यंत्रणेचा अवलंब करताना दिसून येतात.
आणखी वाचा-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले, चारवेळा..!
एका रात्रीत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नेत्यांकडून उडी मारण्याचा प्रकार आता जोमाने वाढला आहे. त्याचे कार्यकर्त्यांनाही काही वाटत नाही. आणि मतदारांना वाटले, तरी त्याचा काही उपयोग नसतो, कारण त्यांना गृहीत धरलेले असते. मतदारांची संख्याही अफाट वाढली असल्यामुळे हजारी कार्यकर्ते आता कमी पडू लागले आहेत. शिवाय नेता तसा कार्यकर्ता, या न्यायाने हजारी कार्यकर्ता हादेखील नेत्यांसारखाच होऊ लागला आहे. सर्वस्वाचा त्याग करून काम करण्याची या हजारी कार्यकर्त्याची तळमळ आता कमी होऊ लागली आहे. तोदेखील व्यावहारिक होऊ लागला आहे.
पुण्यातील अगदी प्रारंभीच्या काळातील मतदारांची संख्या पाहिली, तर हजारी कार्यकर्ता हा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत होता. १८८२-१८८५ या कालावधीत पुण्यातील मतदारांची संख्या अवघी चार हजार ९१८ होती. १९२२ पर्यंत मतदारांची संख्या ही जेमतेम सात हजार होती. १९२२-१९२५ या कालावधीत पहिल्यांदा मतदार संख्या १८ हजार २२५ वर पोहोचली. १९२८-१९३२ या काळात ४३ हजार ७०१ मतदार, १९३८-१९४२ या काळात ६६ हजार १७५ मतदार, १९४६-१९४९ या कालावधीत पहिल्यांदा एक लाख मतदारांचा टप्पा ओलांडला गेला. १९५२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत दोन लाख चार हजार २०० मतदारांची नोंद झाली होती. त्यानंतरच्या १९५७ च्या निवडणुकीत दोन लाख २६ हजार ४०० मतदार होते. नंतरच्या निवडणुकांत मतदारांची संख्या वाढतच गेली. १९६८ मध्ये तीन लाख ४५ हजार मतदार झाले. १९९२ मध्ये मतदारांची संख्या दहा लाखांहून अधिक झाली. १९९७ मध्ये ११ लाख ९१ हजार मतदार झाले. मागील २७ वर्षांत पुण्यातील मतदारांची संख्या लाखोंच्या घरात गेली आहे.
आणखी वाचा-विधानसभा निवडणुकीसाठी सकल ब्राह्मण समाजाने घेतला मोठा निर्णय !
सध्या पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांत मतदार ८४ लाख ३९ हजार झाले आहेत. त्यांपैकी पुण्यातील हडपसर मतदार संघात सर्वाधिक ५ लाख ९० हजार, त्या खालोखाल खडकवासल्यात ५ लाख ४५ हजार ८९३ मतदार आहेत. सर्वांत कमी मतदार कसबा पेठ मतदार संघात २ लाख ७८ हजार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात २ लाख ८६ हजार आहेत. शिवाजीनगरमध्ये २ लाख ८१ हजार, कोथरूडमध्ये ४ लाख २१ हजार, पर्वतीत ३ लाख ४४ हजार मतदार झाले आहेत. पुरवणी यादीमुळे या संख्येत आणखी भर पडणार आहे.
लाखोंनी वाढत चाललेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे अवघड काम हजारी कार्यकर्त्यांना करावे लागत असते. या लाखोंपर्यंत हजारी कार्यकर्ते जाणार कसे? शिवाय राजकीय पक्षांचेही दुर्लक्ष असल्याने सद्य:स्थितीत हजारी कार्यकर्ते ही यंत्रणा मोडीत काढल्यासारखीच झाली आहे.
sujit.tambade@expressindia.com