इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी.. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम.. श्री या अक्षराभोवती गिरवलेली बाराखडी.. ए आई मला पावसात जाऊ दे.. शाळेभोवती तळे साठून सुट्टी मिळेल काय.. पुणेरी पगडीच्या पाश्र्वभूमीवरील मी पुणेकर ही अक्षरे.. अश्वारूढ शिवाजीमहाराजांचे चित्र आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ ही घोषणा.. प्रसिद्ध सुलेखनकार (कॅलिग्राफर) अच्युत पालव यांच्या वळणदार अक्षर लेखनाचा आविष्कार असलेल्या टी-शर्टचा कार्निव्हल गुरुवारपासून (१६ जानेवारी) आचार्य अत्रे सभागृह येथे भरविण्यात येणार आहे.
गेली अनेक वर्षे सिल्व्हर प्लेटिंगच्या व्यवसायात असलेल्या दीपक सोमवंशी आणि नूतन सोमवंशी या दांपत्याने सुरू केलेल्या कॅलिग्राफी टी शर्ट उत्पादित करणाऱ्या सिल्व्हर लाईन संस्थेतर्फे या कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य अत्रे सभागृह येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते या कार्निव्हलचे उद्घाटन होणार आहे. अच्युत पालव प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अक्षरसंवाद साधणार असून अक्षरधाराचे रमेश राठिवडेकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. २६ जानेवारीपर्यंत दररोज सकाळी साडेदहा ते रात्री साडेआठ या वेळात हा कार्निव्हल खुला राहणार असून पुणेकरांना टी-शर्ट खरेदीची संधी लाभणार आहे.