छोटीशी वस्तू खरेदी केल्यानंतर तुमची फसवणूक झाली, तर ती वस्तू दोनशे ते तीनशे रुपयांची असल्यामुळे सोडून देऊ नका. कारण, ग्राहकाला सदोष सेवा दिल्याचे आढळून आल्यास ग्राहक मंचाकडे न्याय मिळतो, हे एका खटल्यावरून दिसून आले आहे. दोनशे नव्याण्णव रुपयांचा घेतलेला टी-शर्ट कोणतेही कारण न देता बदलून देण्यास नकार देणाऱ्या अभिरुची मॉलला ग्राहक न्यायमंचाने फटकारले आहे. पाच महिन्यांत निकाली काढलेल्या दाव्यात अभिरुची मॉलने ग्राहकाला टी-शर्ट बदलून देत नुकसान भरपाई आणि खटल्याचा खर्च म्हणून एक हजार रुपये द्यावेत, असे आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात यांनी दिले आहेत.
याबाबत सुनंदा दिवाकर जाधव (रा. डोणजे, माळवाडी) यांनी सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल, इझी डेच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. जाधव यांनी अभिरुची मॉलमधून २९९ रुपयांचा टी-शर्ट खरेदी केला होता. मात्र, तो व्यवस्थित येत नसल्यामुळे त्यांनी त्याच दिवशी सांयकाळी मॉलला फोन करून बदलून मिळण्यासंदर्भात विचारणा केली. त्या वेळी त्यांना सात दिवसांमध्ये केव्हाही येऊन बदलून मिळेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर जाधव या लगेच टी-शर्ट बदलण्यासाठी गेल्या असता त्यांना ‘असा टी-शर्ट विक्रीसाठी नव्हता, असा माल आम्ही ठेवतच नाही, टी-शर्ट वापरून परत आणण्यात आला आहे, माल बघून घेता येत नाही का?’ अशा प्रश्नांचा भडिमार करीत टी-शर्ट बदलून देण्यास नकार दिला. जाधव यांनी मॉलमधील तक्रारवहीत याची नोंद केली. मात्र, त्याची पोच त्यांना देण्यात आली आहे. मॉलकडून मिळालेला अनुभवामुळे जाधव यांनी थेट ग्राहक मंचाकडे याबाबत दावा दाखल केला.
ग्राहक मंचाकडून मॉलला नोटीस बजावण्यात आल्यानंतर ते वकिलांमार्फत मंचासमोर हजर झाले. मात्र, त्यांनी लेखी जबाब सादर केला नाही. त्यामुळे मंचाने ही केस निकाली काढली. जाधव यांनी मंचासमोर टी-शर्ट खरेदी केल्याचे बिल सादर केले आहे. तो टी-शर्ट बदलून देताना मॉलकडून काहीच योग्य कारण दिलेले नाही. हे प्रकरण तडजोडीसाठी लोकन्यायालयात देखील ठेवण्यात आले होते. पण, त्या वेळीही मॉलचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यामुळे सबळ कारणाशिवाय टी-शर्ट बदलून न देता सेवेत त्रुटी निर्माण केली आहे. त्यामुळे मॉलने ग्राहकाला टी-शर्ट परत घेऊन त्याची पूर्ण रक्कम ग्राहकाला परत करावी, असा आदेश मंचाने दिला आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T shirt consumer court compensation service