वनसंवर्धनाच्या चळवळीत वन कर्मचारी आणि अधिकारी यांना अद्ययावत ठेवण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळ लवकरच व्याघ्र अकादमी तर, इको टुरिझमला चालना देण्यासाठी चिखलदरा येथे पर्यटन प्रशिक्षण अकादमी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केली.
वन विभागातर्फे गोखलेनगर येथील भांबुर्डा वन विहार येथे संत तुकाराम वनग्राम योजनेतील जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण आणि वन विश्रामगृहाचे उद्घाटन कदम यांच्या हस्ते झाले. खासदार सुरेश कलमाडी, प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. एच. नकवी, मुख्य वनसंरक्षक जीत सिंग, उपमहापौर बंडू गायकवाड, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, शारदा ओरसे या वेळी उपस्थित होत्या.
गेल्या काही वर्षांत वन विभागाने विविध उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. राज्यातील ७ हजार ५०० वनमजुरांना शासकीय सेवेत दाखल करून घेत असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना बढत्याही दिलेल्या आहेत, असे सांगून कदम म्हणाले, सांगली जिल्ह्य़ातील कुंडल येथे पश्चिम महाराष्ट्रातील प्रशिक्षण देणारी पहिली संस्था सुरू केली असून या संस्थेला केंद्रीय वन्यजीव मंडळाने राष्ट्रीय मान्यता दिली आहे. राज्यातील वन विभागाचे अधिकारी कुंडल येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येणार आहेत. या खेरीज मुंबईतील आरे कॉलनी आणि नागपूर अशी दोन आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालये साकारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बहुतांश कामे मी मार्गी लावणार आहे.
उत्कृष्ट संयुक्त वनव्यवस्थापन समिती जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये बुचकेवाडी (ता. जुन्नर) आणि साकुर्डे (ता. पुरंदर) यांनी प्रथम क्रमांकाचे, करंजगाव (ता. भोर) आणि कन्हेरी (ता. बारामती) यांनी द्वितीय क्रमांकाचे, राजेवाडी (ता. पुरंदर) आणि वागजवाडी (किकवी) या गावांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकाविला. वरिष्ठ वनाधिकारी विलास बर्डेकर यांच्या ‘पोखिला’ या पुस्तकाचे आणि ‘गाथा संयुक्त वनव्यवस्थापन’ या सीडीचे प्रकाशन कदम यांच्या हस्ते झाले. नकवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा