पिंपरी: खासगी मालमत्ताधारक तसेच ठेकेदारांकडून रस्त्यावर टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे रहदारीस अडथळा होत असल्याचे सांगत संबंधितांना दंड आकारण्यात यावा, अशी मागणी सोमवारी (१२ सप्टेंबर) झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी केली. पिंपरी पालिकेतील प्रशासकीय राजवटीत नागरिकांना भेडसावणाऱ्या तक्रारी, अडचणी मांडण्यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये साप्ताहिक जनसंवाद सभांचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून नागरिकांनी विविध अडचणी प्रशासनासमोर मांडल्या आहेत.
हेही वाचा <<< विकासकाकडून शेतकऱ्याची तीन कोटींची फसवणूक; हिंजवडीत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
अनधिकृतपणे जाहिरात फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी. उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसवावी. खुली व्यायामशाळा उभारावी. पथदिवे झाकणाऱ्या फांद्यांची छाटणी करावी. खड्डयात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. रस्त्यांची व ड्रेनेज वाहिन्यांची दुरुस्ती करावी. शौचालयांची नियमितपणे स्वच्छता करावी. रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या बेवारस; तसेच खासगी वाहनांवर कारवाई करावी. पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा. उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना दंड करावा, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी. रस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत. अशा तक्रारी सोमवारी जनसंवाद सभेत करण्यात आल्या. यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन समन्वयक तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तक्रारदार नागरिकांना दिले.