पुणे आणि पिंपरीमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याच्या योजनेसाठी तीस कोटी रुपये उपलब्ध करूनही केवळ मुख्य सचिवांच्या भूमिकेमुळे हे काम थांबले आहे; पण आता त्यांच्या आदेशाची वाट पाहू नका. तुमच्या स्तरावरच निर्णय घेऊन हे काम तातडीने सुरू करा, असा थेट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी महापालिका आयुक्तांसह पोलीस आयुक्तांनाही जाहीररीत्या दिला.
स्वारगेट येथील उड्डाणपुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात पवार यांनी पुण्यातील वाहतूक प्रश्नाचा तसेच येथील बेशिस्त वाहतुकीचा समाचार घेतला. काही बेशिस्त वाहनचालकांमुळे संपूर्ण शहरच बदनाम होते. त्यामुळे या शहरातील वाहतुकीला शिस्तही लावावीच लागेल, असे सांगून पवार यांनी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याच्या रखडलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.
पुण्यातील बॉम्बस्फोटांनंतर दोन्ही शहरांमध्ये कॅमेरे बसवण्याची योजना होती. त्यासाठी दोन्ही महापालिका, दोन्ही शहरांमधील आमदार आणि राज्य शासन यांच्या सहभागातून तीस कोटी रुपये उपलब्धही करून देण्यात आले आहेत. त्यासंबंधीचा निर्णयही झाला. मात्र, मध्यंतरी मी राजीनामा दिला होता. त्यावेळी मी तीन महिने नव्हतो. परत येऊन बघितले, तर मुख्य सचिवांच्या निर्णयामुळे ते काम थांबल्याचे समजले. त्यामुळे निधी असूनही कॅमेरे बसलेले नाहीत, असे पवार म्हणाले.
आता त्यांचेही त्यांना होईना, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नवी मुंबईत कशा पद्धतीने कॅमेरे बसवण्यात आले आहेत ते तुम्ही पाहा आणि तुमच्या स्तरावर तातडीने निर्णय घेऊन लगेच हे काम सुरू करा, असा आदेश पवार यांनी महापालिका व पोलीस आयुक्तांना कार्यक्रमात दिला. एखादी दुर्घटना शहरात घडली नां, तर पुणेकर तुम्हाला सोडणार नाहीत आणि अशा घटनेची जबरदस्त किंमत निष्पाप माणसांना भोगावी लागते. तेव्हा हे काम तातडीने सुरू करा, असेही ते आयुक्तांना म्हणाले.
कॅमेरे बसवण्याचे काम तातडीने सुरू करण्याचा आदेश
नवी मुंबईत कशा पद्धतीने कॅमेरे बसवण्यात आले आहेत ते तुम्ही पाहा आणि तुमच्या स्तरावर तातडीने निर्णय घेऊन लगेच हे काम सुरू करा, असा आदेश पवार यांनी महापालिका व पोलीस आयुक्तांना कार्यक्रमात दिला.
First published on: 21-07-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take immediate action about cctv ajit pawar