पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उंदीर, ढेकणांचा सुळसुळाट झाल्याच्या वृत्ताची दखल थेट विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. वसतिगृहामध्ये त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी, उंदीर, अन्य कीटकांचे निर्मूलन करण्यासाठी उपाययोजना करून विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उंदीर, ढेकणांचा उपद्रव सहन करावा लागत असल्याचे वृत्त लोकसत्ताने गुरुवारी प्रसिद्ध केले होते. उंदरांनी विद्यार्थ्यांना चावा घेतल्याने एका विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर वसतिगृहामध्ये त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी, उंदरांचे निर्मूलन करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, भविष्यात अशी समस्या न उद्भवण्यासाठी नियमित स्वच्छता आणि निगराणी ठेवावी, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्रातील अग्रगण्य विद्यापीठांपैकी एक असून, येथे शिक्षण, संशोधन आणि नवकल्पनांसाठी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. मात्र, अशा प्रकारच्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन आणि अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून द्यावे,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.