पिंपरी: मावळ लोकसभा निवडणुक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून विरोधक पैसे वाटतील ते सर्वांनी घ्या. मात्र, मतदान महाविकास आघाडीला करा. अस आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी केलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते. त्याचबरोबर संजोग वाघेरे यांनी विजयाची खात्री व्यक्त करत साडेपाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येऊ अशी खात्री व्यक्त केली आहे. आज रहाटणी येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.
मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे अशी लढत होणार आहे. दोन्ही शिवसेना आमने- सामने असून कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. निवडणुकीच्या बाबत संजोग वाघेरे यांनी बोलताना मतदारांनी ही निवडणूक ताब्यात घेतली असून या गद्दारांना धडा शिकवतील असा टोला विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना लगावला आहे. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून मी सगळ्यांना सांगेल विरोधक जे पैसे वाटतील ते सर्वांनी घ्या, मात्र मतदान महाविकास आघाडीला करा. अस आवाहन संजोग वाघेरे यांनी मतदारांना केल आहे. पुढे ते म्हणाले, पिंपरी- चिंचवड शहरातून अडीच ते पावणेतीन लाखांचं मताधिक्य मिळेल, तर खाली पनवेल, उरण आणि कर्जत येथे दोन लाखाचं मताधिक्य मिळून एकूण पाच ते साडेपाच लाखाच्या फरकाने निवडून येण्याची खात्री वाघेरे यांनी व्यक्त केली आहे.