पुणे : राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी मंगळवारी रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आली. या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली होती. अंतिम निवड यादीची प्रतीक्षा होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा ही अंतिम यादी जाहीर करण्यात आली.
तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यात ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून दहा लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेची उत्तरसूची प्रकाशित करून उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदविण्यात आले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले. त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले.
हेही वाचा >>>मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा पुण्यात पहिल्याच दिवशी फज्जा
दरम्यान, परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केले आहेत. मात्र, हे आरोप, दावे फेटाळत भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा अंतिम यादी जाहीर करण्यात आली. ही यादी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.आदिवासी जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत, असे भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती २०२३ मधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीचा पुढील टप्पा म्हणून निवड यादी व प्रतीक्षा याद्या तयार करण्याचा होता. त्यानुसार राज्यातील २३ जिल्ह्यांमधील निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केली आहे. उर्वरित आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे.” असे भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त संचालक तथा तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी प्रस्तुत केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा >>>पुणे: मुख्यमंत्र्यांचा पीएमआरडीएला पुन्हा ‘खो’
दरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली या २३ जिल्ह्यांमधील निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.