गणेश यादव, लोकसत्ता
पिंपरी: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, शांत, निसर्गरम्य आणि पुणे-मुंबईकरांनी दुसरे घर (सेकंड होम) म्हणून पसंती दिलेल्या तळेगाव दाभाडे परिसराला गेल्या काही वर्षातील हत्याकांडांमुळे गुन्हेगारीचा कलंक लागला आहे. मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या या शहरातील लोकसंख्या सातत्याने वाढत असताना जमिनीला आलेला सोन्याचा भाव आणि राजकीय वर्चस्व वादातून वाढलेल्या गुन्हेगारीमुळे तळेगाव असुरक्षित झाले आहे. भरदिवसा हत्या करण्याचा ‘मावळ पॅटर्न’ उदयास येत असल्याचे चित्र आहे.
पुणे-मुंबईला जोडणारे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे हे ऐतिहासिक गाव आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या तळेगावमध्ये राहण्यासाठी गेल्या काही वर्षांत नागरिकांची पसंती वाढली. पुणे-मुंबई महामार्ग, एमआयडीसीमुळे तळेगाव दाभाडे येथील जमिनीला सोन्याचा भाव आला. तळेगाव दाभाडे, वडगाव मावळमध्ये प्रचंड जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार झाले. या जमिनीच्या व्यवहारात स्थानिक गुंडांसह मुंबईतील अनेक गुन्हेगारी टोळ्याही उतरल्या. जमिनी बळकावणे, ताबे मारण्याचे प्रकार वाढले. त्यातून मोठ्या प्रमाणात हातात पैसा खेळू लागल्याने अर्थकारण बदलले, राहणीमान उंचावले. हाती पैसा आल्यानंतर अनेकांनी पद, प्रतिष्ठेसाठी राजकीय जीवनाचा श्री गणेशा केला. राजकारणातील संघर्ष, वर्चस्वाच्या ईर्षेतून गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा-पुणे : वाघोलीत संगणक अभियंत्याचा खून
एरवी निर्मनुष्य ठिकाणी, रात्रीच्या अंधारात होणारी गुन्हेगारी भरदिवसा आणि चौकांत आली आहे. गुन्हेगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, अपेक्षित बदला साध्य करण्याची कार्यपद्धती मावळात विकसित होताना दिसत आहे. त्यातूनच दिवसाढवळ्या निर्घृण हत्या होऊ लागल्या आहेत. किशोर आवारे यांच्या शुक्रवारी झालेल्या खुनानंतर मावळातील पूर्वीच्या हत्यांची चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंतचे खून राजकीय वाद, जमिनीच्या व्यवहारातून झाल्याचे बोलले जाते. तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीला चाप कधी आणि कसा लावणार, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारी
मावळातील पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळा, तळेगांव दाभाडे नगर परिषदेवर सध्या प्रशासकीय राजवट आहे. येत्या काळात या नगर परिषदांची निवडणूक होणार आहे. तर वडगांव नगरपालिकेची निवडणूक एक वर्षावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे.
आणखी वाचा- पुणे : डॉ. राम ताकवले यांचे निधन
‘मावळ पॅटर्न’च्या घटना
२०१० मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या झाली.
२०१६ मध्ये तळेगाव-दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची हत्या करण्यात आली.
१ एप्रिल २०२३ रोजी मावळातील प्रति शिर्डी शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचा खून झाला.
१२ मे रोजी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे यांचा खून करण्यात आला.