पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये नव्याने तळेगाव दाभाडे आणि तळेगाव एमआयडीसी या पोलीस ठाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजकीय गुन्हेगारीची तर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यातून सुरू असलेल्या गुन्हेगारीची समस्या मोठी आहे. पुणे, मुंबई महामार्गालगतच्या भागात अवैध धंद्यांमधून ‘भाईगिरी’नेही जोर धरला आहे.

तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तळेगाव नगरपरिषदेचा परिसर तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल कँप आदी भाग येतो. येथील राजकीय वर्चस्वातून झालेले वाद खुनापर्यंत गेले आहेत. तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचा खून झाला होता. शिवाय कुविख्यात गुंड शाम दाभाडे हा चकमकीत मारला गेला होता. मात्र,त्याच्या मृत्यूनंतर त्याची टोळी छुप्या पध्दतीने गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी आहे. राजकीय वर्चस्व आणि वादातून तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा खून झाला होता. त्यामुळे या भागात राजकीय गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणात बोकाळली आहे. मुंबईतील गुन्हेगारांचा वावर तळेगाव परिसरात असल्यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे.

जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहारही या भागात मोठय़ा प्रमाणात चालतात. त्यातून फसवणुकीचे प्रकार घडतात. त्याचा त्रास स्थानिक शेतकऱ्यांना होतो. भाईगिरीमुळे शेतकऱ्यांची होणारी अडवणूक त्रासदायक ठरत आहे. दिवसाढवळ्या धमकावणे, मारहाण करणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पुणे मुंबई महामार्गालगतच्या हॉटेलमध्ये मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. वेश्या व्यवसाय, भेसळीच्या तेलाची विक्री, जुगार, मटका यातून कोटय़वधी रुपयांची उलाढाल या भागात होत असते. कोटय़वधी रुपयांची देवाण घेवाण या धंद्यात होते. कंपन्यांमधील गुंडाराज कंपनी मालकांना डोकेदुखी ठरत आहे. कंपन्यांमधील ठेकेदारीवरून राजकीय पुढाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडतात. याशिवाय परप्रांतीय कामगारांना धमकावणे, मारहाण असेही प्रकार वारंवार घडतात. बेकायदेशीर शस्त्रांचा वापरही या परिसरामध्ये वाढला आहे. सुरक्षारक्षकांना मारहाण करून कंपन्यांमध्ये होणाऱ्या चोऱ्यांमुळे कंपनीमालक हैराण झाले आहेत.

तळेगाव आणि एमआयडीसी परिसरात

* राजकीय वर्चस्ववादातून गुंडगिरी वाढली

* पुणे, मुंबई महामार्गालगतच्या हॉटेलांमध्ये अवैध धंद्यातून कोटय़वधी रुपयांची उलाढाल

* जमीन खरेदी-विक्री व्यवहारातून फसवणुकीचे प्रकार, स्थानिक शेतकऱ्यांना त्रास

* कंपन्यांमधील ठेकेदारी मिळवण्यासाठी गुंडांचा वापर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* बेकायदेशीर शस्त्रांचा वापर