पिंपरी: तळवडे येथील केकवर लावायच्या शोभेच्या फटाक्याच्या (स्पार्कल कँडल) मेणबत्ती कंपनीतील स्फोटात मृत्यू झालेल्या १४ महिला कामगारांच्या नातेवाइकांना मदतीची प्रतीक्षा आहे. या घटनेला २१ दिवस हाेऊनही मृतांच्या नातेवाइकांना शासनाने जाहीर केलेली पाच लाखांची मदत अद्याप मिळालेली नाही.
तळवडे येथील रेडझाेन हद्दीत बेकायदा सुरू असलेल्या मेणबत्ती कंपनीत आठ डिसेंबर रोजी स्फाेट हाेऊन आग लागली. या आगीत सहा महिला कामगारांचा जागीच हाेरपळून मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले हाेते. यामधील आठ महिलांचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेत एकूण १४ महिला कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली. मात्र, २१ दिवस हाेऊनही राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप मृतांच्या वारसांना मिळालेली नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली मदत तरी लवकर मिळावी, अशी मागणी नातेवाइकांमधून केली जात आहे. दरम्यान, कारखाना मालकाने अग्निशामक दलासह काेणतीच परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या घटनेला कारखाना मालकासह महापालिका प्रशासनही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप असताना मृतांच्या वारसांना महापालिकेने मदत केलेली नाही.
हेही वाचा… …अन ती कोयता गँगला भिडली; पोलीस हवालदार सीमा वळवी यांच्या प्रसंगावधानमुळे अनर्थ टळला
आग दुर्घटनेत सुरुवातीला नऊ महिलांचा मृत्यू झाला हाेता. त्यांच्या वारसांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला तत्काळ प्रस्ताव पाठविला. ताे प्रस्ताव राज्य शासनाकडे गेला आहे. पाच मृतांच्या काेणत्या नातेवाइकांना मदत द्यायची यावरून संभ्रम हाेता. त्यांच्या नातेवाइकांचे प्रतिज्ञापत्र घेतल्यानंतर त्याचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे. ताे प्रस्ताव राज्य शासनाकडे जाईल. नातेवाइकांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच पंतप्रधान सहायता निधी मिळविण्यासाठीही पीएम संकेतस्थळावर ऑनलाइन माहिती भरण्यात आल्याचे तहसीलदार अर्चना निकम यांनी सांगितले.