पुरेसा पोलीस बंदोबस्त न घेता तळवडे येथे अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यासाठी गेलेल्या िपपरी पालिकेच्या अभियंत्यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषास सामोरे जावे लागले. ग्रामस्थांनी कारवाईला विरोध करताना त्यांना मारहाण केली व कारवाई सोडून पळून जाण्यास भाग पाडले.
िपपरी पालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून कारवाई सुरू आहे. मात्र, ही बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव मंजूर होण्याच्या हालचाली दिसू लागल्यानंतर पाडापाडी कारवाई मंदावली होती. राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलेला राजीनामा व विरोधी पक्षांनी काढलेला मोर्चा यामुळे वातावरण पेटलेले असतानाच शुक्रवारी तळवडय़ात अचानक कारवाईसाठी गेलेल्या अभियंत्यांना चांगल्याच संकटाला सामोरे जावे लागले. तळवडे गावठाणात पाया व काही कॉलम उभे असलेले कच्चे बांधकाम होते, ते पाडण्यास सुरुवात करताच ग्रामस्थांनी विरोध केला. तरीही अभियंते कारवाई करू लागल्याने ग्रामस्थांशी बाचाबाची झाली, त्याचे पर्यावसन अभियंत्यांना धक्काबुक्कीत झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अभियंत्यांनी तेथून काढता पाय घेतला व ते मोटारीत जाऊन बसले. मात्र, त्यांना मोटारीतून बाहेर ओढून मारहाण करण्यात आल्याचे समजते. या कारवाईसाठी पुरेसा बंदोबस्त नव्हता. अवघे तीन पोलीस कर्मचारी घेऊन हे अभियंते कारवाईसाठी गेले होते. त्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात, अधिकृतपणे बोलण्यास कोणीही तयार नाही. या घटनेमुळे कारवाईसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.