बारामती : चालु वर्षीचा चिंच हंगाम सुरू होत असल्याने बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सुपे उपबाजार येथे शनिवारी ( दि. २२ ) रोजी चिंचेचा लिलावाचा शुभारंभ सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांचे हस्ते होणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी आपली चिंच स्वच्छ, वाळवुन व चांगल्या पॅकींग मध्ये आणावी. तसेच शेतक-यांनी आपला माल लिलावापुर्वी आणावा व बाजार आवारात विक्री करावी,असे आवाहन सर्व चिंच उत्पादक शेतक-यांना बारामती बाजार समितीच्या वतीने करणेत येत आहे.
सुपे उपबाजार ही चिंच लिलावासाठी पुणे ज़िल्ह्यात प्रसिद्ध अशी जुनी नावाजलेली बाजारपेठ आहे. त्यामुळे बारामती तालुक्यासह शिरूर, दौंड, पुरंदर, फलटण, श्रीगोंदा, इंदापुर, भोर इत्यादी तालुक्यातुन तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातुन सुद्धा चिंच विक्रीसाठी येत असते. या चिंचेचे लिलाव दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता सुरू होतील. त्यामुळे खरेदीदारांनी वेळेत उपस्थित रहावे. गतवर्षी अखंड चिंचेस किमान रू. २,२००/- ते कमान रू. ५,०००/- प्रति क्विंटल तर फोडलेली चिंचेला किमान रू. ४,५००/- व कमाल रू. १०,०००/- प्रति व्किंटल असे दर निघाले होते.
चिंच खरेदीसाठी बारामती, पुणे, बार्शी, तुळजापुर, लातुर, औरंगाबाद, हैद्राबाद इत्यादी भागातुन खरेदीदार मोठया प्रमाणात येत असतात अशी माहिती बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दैनिक लोकसत्ता प्रतिनिधीशी बोलताना दिली.