विकास आराखडा हरकती-सूचनांची सुनावणी घेण्यासाठी नियोजन समिती नेमण्याच्या प्रक्रियेत गुरुवारी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा विजय झाला. तीन सदस्यांच्या नियुक्तीसाठी महापालिकेत झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे आणि चेतन तुपे, तर काँग्रेसचे अभय छाजेड बहुमताने विजयी झाले.
नियोजन समितीवर स्थायी समितीमधील तीन आणि शासन नियुक्त चार प्रतिनिधींची नियुक्ती केली जाते. स्थायी समितीमधून निवडून द्यायच्या तीन जागांसाठी गुरुवारी निवडणूक झाली. या तीनपैकी एक जागा विरोधी पक्षातील एका सदस्याला मिळावी, अशी मागणी महायुतीतर्फे करण्यात आली होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी ती मान्य न केल्यामुळे अखेर तीन जागांसाठी मनसेचे रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांनीही अर्ज दाखल केले. विरोधकांनीही अर्ज दाखल केल्यामुळे अखेर मतदान घेण्यात आले. त्यात आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून आले. त्यांना ७१ मते मिळाली, तर महायुतीच्या उमेदवारांना ६६ मते मिळाली.
काँग्रेसचे दबावतंत्र यशस्वी
या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे अरविंद शिंदे यांची नियुक्ती विरोधी पक्षनेता पदावर करत असल्याचे पत्र महापौर वैशाली बनकर यांनी दिले. त्यामुळे ही निवडणूक आघाडीला सोपी झाली. शिंदे यांना पत्र दिले गेले नसते, तर काँग्रेसकडून काही वेगळा विचारही झाला असता. ही परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून यावेत यासाठी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर आघाडीचे यश सुकर झाले. राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेता पद दिले नाही, तर या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घ्यायची असे काँग्रेसचे धोरण होते. हे दबावतंत्र यशस्वी झाले आणि काँग्रेसला पद मिळाले, अशी चर्चा पालिकेत ऐकायला मिळाली.
आराखडय़ाशी थेट हितसंबंध
नियोजन समितीवर जे तीन सदस्य गुरुवारी नियुक्त झाले, त्यातील दोघांचे विकास आराखडय़ाशी थेट हितसंबंध आहेत. त्यामुळे त्यांनी आपणहून हे पद सोडावे. ज्यांनी या आराखडय़ात घोटाळे केले, तेच आता या प्रकाराबाबत सुनावणी घेणार असल्यामुळे या प्रकाराला आमची हरकत आहे, असे पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर यांनी सांगितले. हेच तिन्ही सदस्य समितीवर राहिले, तर लोकायुक्तांकडे हे प्रकरण नेले जाईल, असेही त्यांनी सांगितले.