दक्षिणेच्या राजाने सम्राट हर्षवर्धनाचा पराभव केला होता, हा इतिहासातील एक प्रसंग ताम्रपटाच्या पुराव्याआधारे प्रकाशामध्ये आला आहे. ही ऐतिहासिक लढाईजिंकून परत येताना पुलकेशी द्वितीय राजाने औरंगाबादजवळच्या पैठण परिसरातील ब्राह्मणवटवीय म्हणजेच ब्राह्मणगाव आणि वडवाळी या दोन गावांतील जमीन नागशर्मा नावाच्या विद्वानाला या ताम्रपटाद्वारे दिली होती. या ताम्रपटातील उल्लेखावरून सम्राट हर्षवर्धनाचा पराभव करून बदामीला परत येताना गोदावरीच्या तीरी पुलकेशी राजाने हे दान दिल्याचे स्पष्ट होते.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे प्रबंधक श्रीनंद बापट यांनी या ताम्रपटाचे संशोधन करून वाचन केले. ही माहिती देणारा ताम्रपट बापट आणि इतिहासाचे अभ्यासक प्रदीप सोहोनी यांना मुंबई येथील नाणेसंग्राहक रघुवीर पै यांच्याकडून प्राप्त झाला.
कनौजचा बलाढय़ सम्राट हर्षवर्धन याचा पराभव बदामी (जि. बागलकोट) येथील चालुक्य नृपती द्वितीय पुलकेशी याने इसवी सन ६१८-१९ च्या हिवाळ्यातच केला होता, अशी माहिती या ताम्रपटाच्या वाचनातून पुढे आली आहे. यापूर्वी ही लढाई इसवी सन ६१२ ते ६३४ या २२ वर्षांच्या कालखंडात कधी तरी झाली असावी असे मानले जात होते. मात्र, या ताम्रपटाच्या वाचनातून तो काळ अवघ्या चार महिन्यांवर आला आहे. उत्तरेकडील बलाढय़ सम्राट हर्षवर्धनाला पराभूत करणारा द्वितीय पुलकेशी हा पहिलाच दक्षिणी राजा होता हे सिद्ध झाले आहे. या लढाईमुळे नर्मदा नदी ही उत्तर आणि दक्षिण भारतामधील राजकीय सीमा म्हणून मानली जाऊ लागली. ही सीमा थेट मुघल काळापर्यंत तशीच राहिलेली दिसते, असे बापट यांनी सांगितले.
या ताम्रपटाद्वारे द्वितीय पुलकेशीने कौशिक गोत्रातील नागशर्मा नावाच्या विद्वानाला ब्राह्मणगाव आणि वडवाळी या दोन गावांतील पन्नास निवर्तने इतकी जमीन दान दिली होती. पुलकेशीच्या नवव्या राज्यवर्षांतील वैशाख पौर्णिमेला असणाऱ्या चंद्रग्रहणाच्या दिवशी म्हणजेच बुधवार ४ एप्रिल ६१९ या दिवशी हे दान देण्यात आले होते, अशी कालगणनेचीही सुस्पष्ट माहिती या ताम्रपटाच्या माध्यमातून मिळते, असेही बापट यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असा आहे हा ताम्रपट
वजन – ९१९ गॅ्रम
भाषा – संस्कृत
लिपी – दक्षिणी वळणाची ब्राह्मी
ओळी – २० ओळींचा मजकूर
ताम्रपट ९.७ सेंटीमीटर कडीत ओवलेला असून त्यावर मुद्रा सुस्पष्टपणे दिसते.