पुणे : माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज यांचे अपहरणनाट्य कथितच असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता उपस्थित झाली आहेत, ती त्यातील काही ‘वळणां’वरील प्रश्नचिन्हे. त्यातील परदेशात चाललेले खासगी विमान देशाची हवाई हद्द ओलांडण्यापूर्वी माघारी बोलावले गेल्याचे ‘वळण’ बरेच चर्चेत असून, हे ‘सामर्थ्य’ दाखविण्यासाठी कोणत्या ‘शक्ती’ला साकडे घातले गेले, असा प्रश्न सामान्यांना छळतो आहे. एरवी सामान्यांच्या बाबतीत यंत्रणा अशी ‘शक्ती’ पणाला लावेल का, असाही प्रश्न विचारला जातो आहे.

ही कहाणी सुरू झाली, ती आमदारपुत्राचे अपहरण झाल्याची वार्ता माध्यमांपर्यंत पोचल्यावर. अपहरणाची फिर्याद दिली राहुल सुभाष करळे (वय ४७, रा. सावंत विहार, मोरे बागेजवळ, कात्रज) यांनी. ते सावंत यांच्या नऱ्हे येथील जेएसपीएम शिक्षण संस्थेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागात प्रमुख आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास संचालक (पान ४ वर)(पान १ वरून) शशिकांत थिटे यांनी करळे यांच्याशी संपर्क साधला आणि संस्थेचे विश्वस्त असलेले ऋषिराज यांचा मोबाइल बंद असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ऋषिराज नऱ्हे येथील संस्थेच्या आवारात आहेत का,’ अशी विचारणा करळे यांनी केली. मात्र, त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने त्यांचे अपहरण झाल्याच्या संशयातून करळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलिसांकडून अपहरणाचा तपास सुरू असताना कहाणीत पहिले वळण आले, ते ऋषिराज यांचे अपहरण झालेले नसून, तेच स्वत: कुठे तरी निघून गेल्याची खबर पोलीस सूत्रांना लागल्यानंतर. ते गेले तरी कुठे, या प्रश्नाचा शोध घेताना, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ते कात्रज येथील कार्यालयातून एका मोटारीतून दोन मित्रांसमवेत लोहगाव विमानतळावर गेल्याची माहिती सायंकाळी समजली.

ही माहिती, ऋषिराज आणि मित्रांना विमानतळावर सोडून परत आलेल्या चालकाने तानाजी सावंत यांना दिली आणि सावंत यांनी ती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांना. येथे कहाणीत दुसरे वळण येऊन, अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. याचा फारसा उपयोग झाला नाही, कारण कहाणीत तिसरे वळण यायचे होते. ऋषिराज यांना शहरातच थांबविण्याचा प्रयत्न सुरू असताना, विमानाने मात्र पुणे विमानतळावरून उड्डाण केलेही होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौकशीत ऋषिराज दोन मित्रांसमवेत परदेशात जात असल्याचे समजले. पोलीस सूत्र सांगतात, की उडालेले विमान परत आणण्यासाठी सर्व ‘शक्तिशाली’ सूत्रे हलवली गेली आणि ऋषिराज यांचे विमान भारतीय हवाई हद्द सोडून जाण्यापूर्वीच माघारी वळविण्यात आले. हेच ते कहाणीतील चौथे वळण! विमान रात्री नऊच्या सुमारास पुणे विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर ऋषिराज आणि त्यांच्या दोन मित्रांना पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी लोहगाव विमानतळावरून ताब्यात घेतले. याबाबत ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीने तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

तानाजी सावंत यांचा मुलगा खासगी विमानाने बँकॉकला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर यंत्रणांशी समन्वय साधून हे विमान सोमवारी रात्री नऊच्या सुमारास लोहगाव विमानतळावर उतरविण्यात आले. सावंत यांचा मुलगा आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांची चौकशी करण्यात येणार आहे. – रंजनकुमार शर्मा, पोलीस सहआयुक्त

हे प्रश्न अनुत्तरित…

● मोबाइलवर संपर्क होत नव्हता, तर थेट अपहरणाची तक्रार का देण्यात आली?

● ऋषिराज बँकॉकला जाणार आहेत, हे कुटुंबीयांना नेमके कधी माहीत झाले?

● तपासासाठी पोलीस यंत्रणेवर काही दबाव आला का?

● खासगी विमान हवेतून माघारी वळविण्याएवढी ही घटना खरेच गंभीर होती का?

● सामान्य माणसाला त्याच्या आपत्कालीन स्थितीतही यंत्रणांचे असे सहकार्य मिळेल का?

Story img Loader