शासकीय कामकाजासाठी मंत्री दौऱ्यावर जातात. पण पुण्यातील निवासस्थानी येण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे असा तीन दिवसांचा शासकीय दौरा काढला असून, पुण्यातील निवास्थानी येण्यापुरत्या मर्यादित असलेल्या या दौऱ्यात कोणते शासकीय काम करणार, याचे तपशील मात्र देण्यात आलेले नाहीत. त्यामुळेच डॉ. सावंत यांच्या शासकीय दौऱ्याची समाजमाध्यमांतून जोरदार खिल्ली उडवण्यात येत आहे.
हेही वाचा – पुणे : रस्ते महामंडळाच्या वर्तुळाकार रस्त्याचे ८० टक्के मूल्यांकन पूर्ण
शासनाच्या माहिती अधिकाऱ्यांमार्फत मंत्र्यांच्या शासकीय दौऱ्याची माहिती महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस, वाहतूक पोलिसांना दिली जाते. त्यानुसार संबंधित यंत्रणेकडून व्यवस्था करण्यात येते. सर्वसाधारणपणे दौऱ्याच्या माहितीमध्ये मंत्र्यांच्या नियोजित कार्यक्रमांचा, ते जाणार असलेल्या ठिकाणांचा तपशील देण्यात येतो. त्यानुसार आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीतील मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे दौऱ्याची माहिती देण्यात आली. मात्र २८ ऑगस्टला मुंबईतून प्रयाण केल्यानंतर पुण्यातील कात्रज येथील निवासस्थान येथे आगमन, २७ आणि २८ ऑगस्ट हे दोन्ही दिवस राखीव एवढाच दौऱ्याचा तपशील नमूद करण्यात आला. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत तीन दिवस आणि चार जिल्ह्यांचा दौरा पुण्यातील निवासस्थानी राहूनच करणार का, अशी खिल्ली समाजमाध्यमातून उडवण्यात येत आहे.