दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे प्रकरणामुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटेंना पत्र लिहून थेट सोम्या-गोम्या असा उल्लेख करत त्यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचेच कान टोचले आहेत. त्यामुळे भिसे मृत्यू प्रकरण आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामुळे हा वादच समोर आला आहे. दरम्यान या पत्रानंतर धीरज घाटेंची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
मेधा कुलकर्णींनी लिहिलेलं पत्र काय?
मा. धीरज घाटे,
शहराध्यक्ष, पुणे शहर भाजपा</p>
गर्भवतीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. माझ्या संपूर्ण संवेदना दिवंगत मातेविषयी, तिच्या दोन अर्भकांविषयी आणि तिच्या कुटुंबाविषयी आहेत. असा प्रसंग कुणावरही येऊ नये.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आपला सविस्तर खुलासा केला आहे. अनामत रक्कम मागण्यात आलेली नव्हती, उलट न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन गेल्याचं स्पष्टीकरणात म्हटलं आहे. प्रसुती जोखमीची असल्याने मूल दत्तक घेण्याचा सल्ला आणि इतर अनेक वैद्यकीय सल्ले डावलून महिलेच्या आयुष्याशी धोका पत्करुन कुटुंबीयांकडून निर्णय घेण्यात आले असे तपशील खुलाशात आहेत. त्याची शहानिशा करुन चूक घडली असल्यास वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करणं अपेक्षित आहे.
परंतु यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष आहे? याची माहिती करुन न घेता भाजपाच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात जे वर्तन केलं त्याबाबत सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे. इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जी विधाने केली त्याविषयी मी आत्ता बोलत नाही कारण तो आपला विषय नाही. शिवाय आपल्या मतदारांची आपल्या पक्षाप्रति निष्ठा आहे, प्रेम आणि आशीर्वादही आहेत. डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जाऊन तोडफोड करणं हे भाजपाच्या पुणे महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे आणि इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभलं नाही. आंदोलन करण्याच्या सभ्य पद्धती आहेत, ज्याचा अवलंब करणे विचारधारेला धरुन ठरेल असं मला वाटतं. इतर क्षेत्रांप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात हे खरं असलं तरीही चांगले डॉक्टर अस्तित्वात आहेत यावर माझा भरवसा आहे, हे एका डॉक्टरची मुलगी या नात्याने मी खात्रीपूर्वक सांगू शकते. कुठल्यातरी सोम्या-गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्याच्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचं काम नाही. शिवाय डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेची काही संबंध नसताना केलेलं मोडतोडीचं उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागलं आहे. या संदर्भात नागरिकांचे नाराजीचे फोन मला सातत्याने येत आहेत. दिल्लीतील अधिवेशनातून परतल्यावर मी याबाबत माहिती घेतली.
पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनण्यासाठी वेळ लागतो. परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळली जाते आणि त्याचा परिणाम सगळ्यांनाच भोगावा लागतो. शिवाय वड्याचे तेल वांग्यावर काढल्याने विनाकारण एखाद्या व्यक्तीचे, समूहाचे किंवा विशिष्ट समाजाचे कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते.
राजकीय व्यक्तींनी कायमच कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणं आवश्यक असतं. सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाम्याचे किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजेत. हे समजावून सांगण्याचं कार्य आपण शहराध्यक्ष या नात्याने कराल आणि महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देऊन त्यांना त्यांच्या पदाचा समजदारपणे आणि विनम्रतेने वापर कर्यास सांगाल अशी अपेक्षा करते. अनुभव नसल्याने चूक होऊ शकते पण लक्षात आल्यावर ती दुरुस्त करणं आवश्यक आहे. हा प्रश्न, हा मुद्दा मी सर्वांच्या सद्सद् विवेक बुद्धीवर सोडते आहे. असं मेधा कुलकर्णींनी म्हटलं आहे. दरम्यान याबाबत धीरज घाटेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
धीरज घाटे काय म्हणाले?
या पत्राबाबत प्रतिक्रिया देताना धीरज घाटे म्हणाले, मला हे पत्र मेधा कुलकर्णींनी दिलं नाही माध्यमांच्या मार्फत हे पत्र मला समजलं. त्यांनी हे पत्र थेट मला द्यायला हवं होतं. महिला मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांमुळे त्यांनी पत्र दिलं आहे. मात्र, एका महिलेला प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याने महिलांचा रोष हा साहजिक आहे. मेधा कुलकर्णी आणि मी काल स्थापना दिनाच्या कार्यक्रमात भेटलो होतो, त्यावेळी या पत्रासंदर्भात काहीही बोलणं झालं नाही. त्यांनी पक्षाच्या बैठकीत ह्या गोष्टी बोलायला हव्या होत्या, पत्राच्या माध्यमातून सगळ्यांना द्यायला नको होतं, मीडियाच्या माध्यमातून हे पत्र मला मिळालं आहे, असंही घाटे यांनी स्पष्ट केलं आहे.