Tanisha Bhise Death Case Deenanath Mangeshkar Hospital : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांची दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने उपचारांआधीच अनामत रक्कम भरण्यासाठी अडवणूक अडवणूक केल्यामुळे गर्भवती तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप भिसे कुटुंबियांकडून करण्यात आला होता. ही घटना समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती देखील नेमली. आज (७ एप्रिल) या चौकशी समितीचा अहवाल समोर आला असून यामध्ये भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात रुग्णालय प्रशासन दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, भिसे कुटुंबाने आरोप केला होता की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी उपचारांआधी १० लाख रुपये इतकी अनामत रक्कम भरण्यासाठी अडवणूक केली होती. त्यामुळे डॉ. घैसास यांच्यावर टीका होत आहे. यामुळे डॉ. घैसास चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. या चौकशीला कंटाळून घैसास यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. आमदार अमित गोरखे यांच्यासह अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रुग्णालय प्रशासनाची बदनामी, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय आणि चौकशीला कंटाळून डॉ. घैसास यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. केळकर हे काही वेळात पत्रकार परिषद घेऊन घडलेली घटना व घैसास यांच्या राजीनाम्याबद्दल बोलतील.

आमदार अमित गोरखे काय म्हणाले?

अमित गोरखे म्हणाले, “भिसे कुटुंबाचं सुरुवातीपासून म्हणणं होतं की या दुर्दैवी मृत्यूला डॉ. घैसास जबाबदार आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चांगलं काम करत आहे आणि पुढेही करेल. राज्य सरकारने व मंगेशकर कुटुंबाने ज्या उदात्त हेतूने हे रुग्णालय चालू केलं होतं. त्या हेतूला कुठेतरी काळीमा फासण्याचं काम डॉ. घैसास यांच्या कृतीने केला आहे. त्यामुळे आमची मागणी होती की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. आज त्यांनी राजीनामा दिला आहे. याचाच अर्थ तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात कुठेतरी घैसास यांना अपराधीपणा वाटत होता. त्याच अपराथी भावेतून त्यानी राजीनामा दिला असावा. आपण कुठेतरी चुकलोय ही भावना त्यांच्या मनात आली असेल म्हणून त्यांनी राजीनामा दिला असावा.”