Deenanath Mangeshkar Tanisha Bhise Case : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचं प्रसुतीदरम्यान निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने १० लाख रुपये अनामत रक्कम भरण्यास सांगितल्याने भिसे कुटुंबियांना दुसऱ्या रुग्णालयात जावं लागलं. या गदारोळात तनिषा भिसे यांची प्रसूती झाली. त्यांनी जुळ्या मुलींना जन्मही दिला. पण प्रसूतीनंतर तनिषा भिसे यांचं निधन झालं. या प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची सर्वत्र टीका होत असताना रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. धनंजय केळकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मात्र, माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे न देताच त्यांनी आज पत्रकार परिषद गुंडाळली.
भिसे कुटुंबियांना अनामत रक्कम भरण्यास सांगण्यात आले होते का? डॉक्टर अशा पद्धतीने डिपॉझिट भरण्यास सांगू शकतात का? असे प्रश्न डॉ. धनंजय केळकर यांना विचारण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले, “आमच्याकडे डॉक्टर कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट मागत नाहीत. कारण तशी पद्धतच आमच्याकडे नाही. रुग्णालयाकडून खर्चाचे अंदाजपत्रक प्रत्येक रुग्णाला दिलं जातं. त्यावरही डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही. त्यादिवशी कोणत्या कारणाने राहू-केतू काय डोक्यात मध्ये आला, डॉ. घैसास यांनी चौकोनात १० लाखांचं डिपॉझिट लिहिलं. ही गोष्ट खरी आहे. पण यापैकी (उपस्थित डॉक्टर) तुम्ही कोणालाही विचारू शकता, डॉक्टरांकडून अनामत रक्कम मागितली जात नाही. आजवर मी अगणित शस्त्रक्रिया केल्या आहेत, पण आतापर्यंत कोणालाही असं लिहून दिलं नाही”, असं डॉ. धनंजय केळकर यांनी स्पष्टीकरण दिलं.
डॉ. घैसास यांनी राजीनामा का दिला?
डॉ. सुश्रूत घैसास हे या रुग्णालयाचे मानद प्रसुती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. ते रुग्णालयाचे कर्मचारी नसून ते गेले १० वर्षे कन्सल्टन्ट म्हणून काम करतात. त्यांनी राजीनामा दिला आहे. गेले काही दिवस ते सामाजिक दडपणाखाली वावरत आहेत, धमक्यांचे फोन, समाजमाध्यमांवर होणारी कठोर टीका आणि सामाजिक संघर्षामुळे होणारे वातावरण त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे आहे. त्याचा आताच्या रुग्णांच्यावर उपचारांवर परिणाम होईल अशी भीती वाटत आहे. यामुळे त्यांच्या वैद्यकीय विषयावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत, रात्रीही झोपू शकत नाहीत. त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा आणि कुटुंबाच्या संरक्षणाकरता त्यांनी दीनानाथ रुग्णालयातील पदाचा राजीनामा दिला आहे. ते फक्त इथेच काम करतात”, असंही डॉ. केळकर म्हणाले.
अनामत रक्कम घेण्याची पद्धत बंद केली
अनामत रक्कम घेण्याची पॉलिसी लहान रक्कमांसाठी नव्हती. ५ ते १० लाखांच्या रकमांकरिता ही पॉलिसी होती. पण गेल्या चार पाच दिवसांपूर्वी ही पॉलिसी बंद करण्यात आली आहे. गरीब रुग्णांकडून अनामत रक्कम घेतले जात नव्हते.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळणार
रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिताण असल्याने जी संवेदनशीलता किंवा माधुर्य पाहिजे ती कधीकधी कमी होते. ती सुधारण्यासाठी प्रशिक्षण सुरू करण्यात आले.
आम्ही कोर्टात टॅक्स भरतो
महानगरपालिकेचे एकही रुपये थकवले नाहीत. एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नसून आम्ही थेट कोर्टात टॅक्स भरतो. टॅक्स आकारणीची प्रथा कर्मिशिअल केली, त्याविरोधात आम्ही कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने दिलेल्या निकालानुसार आम्ही कोर्टात टॅक्स भरतो.
माध्यमांना रुग्णाची माहिती दिली नाही
माध्यमांना जो अहवाल दिला, त्यामध्ये रुग्णाची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अहवाल शासनाला पाठवला आहे. माध्यमांना जी माहिती दिली तो घटनाक्रम सांगितलेला आहे. आता मेडिकल उपचार काय दिली गेली हे शासनाच्या अहवालात आहे. पूर्वीचे काय आजार आहेत ते सांगितलेलं नाही, असंही स्पष्टीकरणही डॉ. धनंजय केळकर यांनी दिलं.