पुणे : ‘पुणे महापालिकेच्या मिळकतकराची काही हजार रुपयांची थकबाकी न भरणाऱ्या नागरिकांच्या घरासमोर महापालिका वसुलीसाठी बँड वाजवते. मग २७ कोटी रुपयांचा मिळकतकर थकविणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर महापालिकेने बँड का वाजवला नाही,’ असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केला. महापालिकेने ४८ तासांत थकीत मिळकतकराबाबत निर्णय न घेतल्यास महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा खासदार सुळे यांनी दिला.
बारामती लोकसभा मतदारसंघातील महापालिकेच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी खासदार सुळे यांनी सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘सामान्य नागरिकांनी १० हजार ते २० हजारांचा मिळकतकर थकविला, तर महापालिका घरासमोर बँड वाजविते. मग कोट्यवधींचा मिळकतकर थकविणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला वेगळा न्याय का?’
‘गर्भवतीला रुग्णालयात साडेपाच तास बसवून ठेवले आणि १० लाख रुपयांची मागणी केल्याचे चौकशी समितीच्या अहवालामधून समोर आले आहे. या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,’ अशीही मागणी सुळे यांनी केली.
दरम्यान, रुग्णालयाकडून थकीत मिळकतकर वसूल करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. या वेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस कृष्णा साठे, दीपक चौगुले, ज्ञानेश्वर जाधव, कुलदीप नाईकनवरे, देवेंद्र खाटीर, बाबा मिसाळ, सुनील कुसाळकर, हृषीकेश आंधळे आदी उपस्थित होते.
महापालिका नोटीस बजावविणार
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय असल्याने मिळकतकरात सवलत द्यावी, अशी मागणी रुग्णालयाने करून महापालिकेच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मिळकतकर भरण्याच्या सूचना रुग्णालयाला वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. २०१७ पासून २०२५ पर्यंत रुग्णालयाने १५ कोटींचा कर भरला आहे. मात्र, अद्यापही २० ते २२ कोटी रुपयांचा कर रुग्णालयाकडे थकीत असल्याचे मिळकतकर विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी सांगितले. मिळकतकर भरावा, यासाठी रुग्णालयाला नोटीस दिली जाणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.