पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात शनिवारी भरधाव टँकरने सात ते आठ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. बाह्यवळण मार्गावरून टँकर दुपारी चारच्या सुमारास निघाला होता. टँकरचालकाचे नियंत्रण सुटले. टँकरने एकापाठोपाठ सात ते आठ वाहनांना धडक दिली. अपघातात मोटारींचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने तातडीने बाजूला काढण्यात आली. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अपघातात कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…पुणे : बुधवार पेठेत वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून

बाह्यवळण मार्गावरील नवले पूल, भूमकर पूल परिसरात यापूर्वी गंभीर स्वरुपाचे अपघात घडले आहेत. नवले पूल परिसरात एकापाठोपाठ झालेल्या गंभीर अपघातांची दखल घेऊन वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेने एकत्र येऊन या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. बाह्यवळण मार्गावरील दरीपूल ते नवले पुलावर तीव्र उतार आहे. तीव्र उतारावर मालवाहू वाहनांचे ब्रेक निकामी होऊन अपघात घडतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanker collides with seven to eight vehicles near navale bridge in pune causing another accident pune print news rbk 25 psg