संपूर्ण शहरात पाणीटंचाई भासत असताना या टंचाईचा फायदा उठवण्याचा आणि पुणेकरांना वेठीला धरण्याचा उद्योग खासगी टँकर चालकांनी सुरू केला आहे. पाण्याची चोरी व काळाबाजार रोखण्यासाठी टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवण्याची सक्ती महापालिकेने केल्यामुळे या सक्तीला विरोध करत टँकरचालकांनी आता सोमवारपासून (२१ जुलै) टँकर बंद करण्याचा इशारा दिला आहे. .
शहरात सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून पाणीटंचाईमुळे टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागणीत वाढ झाल्यामुळे टँकर चालकांनी दरामध्येही आठशे ते हजार रुपयांनी वाढ केली असून पाण्याचा काळाबाजारही जोरात सुरू झाला आहे. शहरातील दोनशे टँकर महापालिकेच्या टँकरभरणा केंद्रावरून पाणी घेतात आणि ते शहरात पुरवतात. तसेच महापालिकेनेही अनेक खासगी टँकर भाडय़ाने घेतले असून त्यांच्या मार्फतही शहरात पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अनेकदा हे टँकर हद्दीबाहेरील कंपन्यांना विकले जात असल्याचे उघड झाले आहे. पाण्याची ही चोरी रोखण्यासाठी महापालिकेकडून पाणी घेणाऱ्या सर्व टँकर चालकांनी त्यांच्या टँकरवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) बसवून घेण्याचा आदेश पाणीपुरवठा विभागाने काढला होता. तसेच २१ जुलैपर्यंत ही यंत्रणा जे टँकर चालक बसवून घेणार नाहीत त्यांना महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जाणार नाही, असेही कळवण्यात आले होते.
जीपीएस यंत्रणेमुळे पाण्याची चोरी रोखता येणार असून ज्या ठिकाणी टँकर मोकळा केला जाणे अपेक्षित आहे तेथेच तो गेला किंवा नाही हेही समजणार आहे. टँकर चालकांना पाण्याची चोरी आणि काळाबाजार करणे या यंत्रणेमुळे शक्य होणार नाही. त्यामुळे आता महापालिकेचा आदेशच टँकरचालकांनी धुडकावून लावला आहे. ही यंत्रणा बसवून घेणार नाही, असे शुक्रवारी टँकर चालकांनी महापालिकेत जाहीर केले. तसेच २१ जुलैपासून टँकर बेमुदत बंद केले जातील, असाही इशारा टँकर चालकांनी दिला आहे. टँकर चालकांची मागणी महापालिका प्रशासनाने अमान्य केली असून पाण्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी महापालिका स्वत:च्या वीस टँकरनाही जीपीएस यंत्रणा बसवणार आहे. महापालिकेने सांगितल्याप्रमाणे यंत्रणा बसवून घेण्यासाठी प्रत्येक टँकरला आठ हजार रुपये लागणार असून आम्हाला हा खर्च शक्य नाही, असे टँकर चालकांचे म्हणणे आहे.
पाण्याची चोरी रोखण्यासाठी टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तो योग्यच आहे. या यंत्रणेमुळे पाण्याची चोरी थांबेल. त्यामुळे आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत.
व्ही. जी. कुलकर्णी
पाणीपुरवठा विभाग प्रमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा