आकाशातील तारे, ग्रहमाला, नक्षत्र यांची अनुभूती देणारे आणि खगोलशास्त्राच्या विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पर्वणी ठरेल असे तारांगण महापालिकेतर्फे उभारण्यात येणार असून कार्ल झियास या जर्मनीतील कंपनीचे तांत्रिक सहकार्य या तारांगणासाठी घेतले जाणार आहे. दोन मजली इमारत, शंभर आसनक्षमतेचे वैशिष्टय़पूर्ण प्रेक्षागृह, आकाशदर्शनासाठी उंच मनोरा, भव्य घुमट, त्रिमिती तंत्रज्ञानाचा वापर ही या तारांगणाची वैशिष्टय़े आहेत.
सहकारनगरमधील अध्यापक कॉलनी परिसरात असलेल्या क्रीडांगणावर हे तारांगण उभे राहणार असून या क्रीडांगणाचा वापर सध्या राजीव गांधी ई-लर्निग स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी केला जातो. मैदानाच्या दहा टक्के जागेवर तारांगणाची उभारणी केली जाणार असल्याचे नगरसेवक आबा बागूल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तारांगण प्रकल्पाचे वास्तुरचनाकार आनंद उपळेकर हेही या वेळी उपस्थित होते. तारांगणाची मूळ कल्पना बागूल यांची असून उपळेकर यांनी पं. भीमसेन जोशी कलादालनासह इतरही वैशिष्टय़पूर्ण प्रकल्प साकारले आहेत.
तारांगणाच्या दोन मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावर घुमट बांधला जाणार असून त्याचा व्यास साडेबारा मीटर इतका असेल. या घुमटावर त्रिमिती तंत्राचा वापर करून आकाशदर्शनासह तारे, नक्षत्र, ग्रहमाला वगैरेंवरील चाळीस ते साठ मिनिटांच्या फिल्म दाखवल्या जातील. वातानुकूलित प्रेक्षागृहामध्ये शंभर आसने बांधण्यात येणार असून त्यात बसल्यानंतर पूर्णत: मागे रेलून घुमटावरील दृश्ये पाहता येतील. या प्रकल्पासाठी पाच कोटी रुपये एवढा खर्च येणार असून येत्या पाच महिन्यात त्याची उभारणी पूर्ण होईल, असेही बागूल यांनी सांगितले. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री कै. विलासराव देशमुख यांचे नाव या तारांगणाला दिले जाणार आहे.
आकाशदर्शनासाठी बांधण्यात येणारा पंधरा मीटर उंचीचा मनोरा हेही या प्रकल्पाचे वैशिष्टय़ आहे. तेथे अत्याधुनिक अशा चार दुर्बिणी असतील आणि वर जाण्यासाठी छोटी लिफ्टही असेल. रात्री या मनोऱ्यातून आकाशदर्शनाचा आनंद लुटता येईल. जगात येऊ घातलेल्या अत्याधुनिक तंत्राचा वापर केलेले हे देशातील पहिले तारांगण ठरेल. आकाशदर्शन विषयाशी संबंधित वेगवेगळ्या फिल्म या ठिकाणी दर महिन्याला उपलब्ध असतील, त्यामुळे या तारांगणात सदैव काही ना काही वेगळे पाहायला मिळेल, असे उपळेकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा