डागडुगीच्या नावाखाली कोटय़वधींची उधळपट्टी; दुरुस्तीसाठीचा स्वतंत्र निधी खर्चाविना

शहरातील गल्लीबोळातील प्रमुख रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे पेव फुटले असतानाच सिमेंट काँक्रिटच्या पुलांचे डांबरीकरण करण्याचा ‘प्रताप’ महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सुरू झाला आहे. पुलांची डागडुजी झाली नसल्याचे कारण करीत सिमेंट काँक्रिटच्या पुलांवर तब्बल १ कोटी ९६ लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात येणार आहे. सिमेंट काँक्रिटच्या एकूण आठ पुलांवर डांबराचा थर टाकण्यात येणार आहे.

शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांवर वाहतुकीसाठी विविध ठिकाणी पुलांची उभारणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यातील काही पुलांचे आयुर्मान पन्नास ते साठ वर्षांहून अधिक आहे. महापलिकेच्या अंदाजपत्रकामध्ये पुलांच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा निधी खर्च झाला नसल्यामुळे पुलांची डागडुजीची रक्कमही खर्च झालेली नव्हती. त्यामुळे डागडुजीच्या नावाखाली सिमेंट काँक्रिटच्या पुलांवर डांबरीकरणाचा थर देण्याचा प्रताप अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.

डेक्कन परिसरातून लक्ष्मी रस्ता, कुमठेकर आणि टिळक रस्त्याकडे जाण्यासाठी नदीवरील काकासाहेब गाडगीळ पूल उभारण्यात आला आहे.या पुलापासून डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडय़ात सिमेंट काँक्रिटचा असलेल्या या पुलावर डांबरीकरणाचा थर टाकण्यात आल्याचा प्रकार सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उघडकीस आणला होता. त्यावरून प्रशासनावर जोरदार टीकाही झाली होती. मात्र त्यानंतरही केवळ डागडुजीच्या नावाखाली पुणेकरांच्या कररूपाने जमा झालेल्या पैशांची उधळपट्टी करण्यासाठी आठ पुलांवर डांबरीकरणाचा थर टाकण्याचे प्रस्तावित आहे. सांगवी ते औंध या भागाला जोडणारा पूल, संगमवाडी येथील जुना आणि नवा पूल, कामगार वसाहत ते शाहीर अमर शेख चौकाला जोडणाऱ्या पुलांवर पहिल्या टप्प्यात डांबरीकरणाचा थर टाकण्यात येणार आहे.

शहरातील नद्यांवर पूल बांधण्यात आल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती. पुलावर स्लॅबचा थर नसल्यामुळे पुलाच्या मार्गिकांमधील लहान-मोठी खडी वर येण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पूल हे स्लॅब आणि सिमेंट काँक्रिटचे असतात. त्यावर डांबरीकरणाचा थर टाकावा लागतो मात्र सिमेंट काँक्रिटच्या पुलांचे डांबरीकरण केल्यामुळे पैशांचा दुरुपयोग होत नाही, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

मात्र सिमेंट काँक्रिट पद्धतीने उभारण्यात आलेल्या पुलांवर डांबरीकरणाची आवश्यकताच कशासाठी, असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला असून महापालिका आयुक्त या प्रकाराला दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, अशी विचारणाही होत आहे.

सिमेंट काँक्रिटच्या पुलांचे डांबरीकरण करण्यात आल्यामुळे नागरिकांच्या करांचे पैसे पाण्यात जाणार आहेत. या सर्व प्रकाराची आयुक्त सौरभ राव यांनी सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि त्यांच्या वेतनातून ही रक्कम वसूल करावी.

– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच