दर शनिवारच्या खाद्यभ्रमंतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांची ओळख होते. आजची दोन्ही ठिकाणं तशी वेगळी आहेत. कारण विकत घेऊन काही खाण्याची ती ठिकाणं नाहीत. ही ठिकाणं आहेत ऐन उन्हाळ्यात भर दुपारी पांथस्थांना थंड ताकाने तृप्त करणारी.
ऐन उन्हाळ्यातील सध्याच्या दिवसात भर दुपारी तुम्ही कधी शहराच्या पूर्व भागातून जात असाल तर गुरुवार पेठेतील जैन मंदिर चौकात आवर्जून जा. दुपारी एकनंतर जर तिथे गेलात तर मंदिराच्या बाहेर भरपूर गर्दी तुम्हाला दिसेल आणि शाळकरी मुलं-मुली ताकाचं वाटप करत असलेली तुम्हाला दिसतील. हेच ते प्रसिद्ध ताक घर. जैन अॅलर्ट ग्रुप नावाची एक संस्था आहे. अनेक सामाजिक आणि चांगले उपक्रम ही संस्था करत असते. ताक घर हा त्यातलाच एक उपक्रम. यंदा या ताक घर उपक्रमाचं सहावं वर्ष आहे.
उन्हाळ्यात पाणी देण्याची व्यवस्था अनेक ठिकाणी केली जाते. त्याच उपक्रमाचा ताक घर हा पुढचा भाग. मंदिराबाहेर चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमाची रोज दुपारी एक वाजता सुरुवात होते आणि पुढे तीन तास अखंडपणे शेकडोजण तिथे ताकाचा आस्वाद घेत असतात. उन्हाळा सुरू झाला की हे ताक घर सुरू होतं. इथे जे ताक वाटलं जातं ते ताक कात्रजहून आणलं जातं. तेथील एका दुग्ध व्यावसायिकाकडून ते घेतलं जातं आणि कात्रजहून दुपारी ताकाचे कॅन आले की त्यात मसाला आणि मीठ मिसळून त्याच्या वाटपाचं काम मोठय़ा उत्साहानं मुलं-मुली सुरू करतात. या ताकाच्या एका कॅनमध्ये मीठ आणि ताकाचा मसाला किती घालायचा याचं प्रमाणही ठरलेलं आहे. ताकाचा हा मसाला खास अहमदाबादहून मागवला जातो. घट्ट असं हे ताक पाणी घालून किंवा बर्फ घालून वाढवलं जात नाही. येणाऱ्या सर्वाना घट्ट ताक द्यायचं असाच शिरस्ता आहे, असं राजू बाफना सांगतात. ते या उपक्रमाचे प्रमुखपणे काम पाहतात आणि चिराग दोषी हे संस्थेचे अध्यक्ष आहेत.
इथे ताक वाटप करण्याचं काम शिस्तीत सुरू असतं. प्रत्येकाला एक वा दोन ग्लास ताक दिलं जातं. सर्वानी रांगेत या, ताक पुन्हा हवं असेल तर पहिला ग्लास टाकून देऊ नका, त्याच ग्लासात पुन्हा ताक घ्या, अशा सूचना मुलं प्रेमानं देत असतात. या मुलांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. खूप मनापासून काम करणाऱ्या या मुलांवर या कामातून होणारे संस्कारही महत्त्वाचे आहेत. कोणी रस्त्यात ग्लास फेकला तर उचलून बादलीत टाकण्याचं कामही ही मुलं करतात. रोज सुमारे एक हजार ते बाराशेजणांना ताक वाटप होतं आणि साधारण प्रत्येकी दोन ग्लास धरले तर दोन हजार ते चोवीसशे ग्लास ताकाचं वाटप होतं. अनेकजण ताक घेताना पैसे घ्या असा आग्रह धरतात. अशांसाठी एक छोटी पेटी ठेवण्यात आली आहे. पेटीत लोक मनाप्रमाणे काही ना काही रक्कम टाकतात. काहीजण उपक्रम पाहून मोठी रक्कम देण्याचीही तयारी आयोजकांकडे दाखवतात, हेही या ताक घराचं एक वेगळेपण.
कुठे, कधी ?
ताक घर- गुरुवार पेठ जैन मंदिराच्या दारात
दुपारी एक नंतर
ताकपोयी – शुक्रवार पेठ,
सकाळी साडेदहानंतर