पिंपरी : टाटा मोटर्स कंपनीच्या कार विभागातील (कार प्लांट) वेतनवाढ करार रखडला असल्याने आधीच कामगारांमध्ये तीव्र नाराजी असताना, दिवाळीचा बोनस निर्धारित कालावधीत जाहीर न झाल्याने या नाराजीत आणखी भर पडली आहे. त्याचा परिणाम म्हणून कामगारांनी कंपनीच्या दसरा-खंडेनवमीच्या सामूहिक पूजेवर बहिष्कार टाकला. याद्वारे कामगारांमधील असंतोष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
टाटा मोटर्सच्या कामगारांचा व्यवस्थापनाशी ३ मे २०२२ रोजी वेतनवाढ करार झाला. सुरूवातीपासून दर तीन वर्षांनंतर करार होत होता. यंदापासून तो दर चार वर्षानंतर होईल, असा बदल करण्यात आला. तो कामगारांना मान्य नव्हता. कामगारांचा विरोध असतानाही तो करार मान्य करण्यात आला. इतर विभागांचा वेतनवाढ करार झाला, त्या पध्दतीने कार विभागाचा करार झाला नाही. तो बराच काळ रखडला. त्यावरून या विभागातील कामगारांमध्ये नाराजी आहे.
कंपनीने कामगारांच्या नाष्ट्याची वेळ बदलून ती कमी केली. जवळपास २ हजार कामगारांनी चहा, नाष्ट्या व जेवणावर बहिष्कार टाकून कामगारांनी आपली नाराजी तेव्हा व्यक्त केली. ही घटना ताजी असतानाच नाराजीनाट्याचा दुसरा अंक खंडेनवमीच्या दिवशी दिसून आला. यावेळी नाराजीचे कारण बोनस होते. दसऱ्यापर्यंतही बोनसची घोषणा झाली नाही म्हणून कामगारांमध्ये असलेली नाराजी नव्याने उफाळून आली. कंपनीच्या परंपरेप्रमाणे कामगार, पदाधिकारी आणि व्यवस्थापनातील अधिकारी प्रत्येक विभागात जाऊन एकत्रितपणे खंडेनवमीची पूजा करतात. तथापि, या वर्षी तसे झाले नाही. नाराजीमुळे कामगार संघटनेने कंपनी व्यवस्थापनाशी असहकार पुकारत पूजेवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, कामगारांनी आपापल्या जागेवर वैयक्तिक पूजा केली. मात्र, संयुक्तपणे कंपनीच्या विविध भागात दिवसभर होणाऱ्या पूजांचे कार्यक्रम यावेळी होऊ शकले नाहीत.
संघटनेत दोन गट
कार विभागाचा वेतनवाढ करार झाल्याशिवाय बोनसवर चर्चा नको, अशी अट कामगार संघटनेने व्यवस्थापनासमोर ठेवली आहे. वेतनवाढ करार व बोनसचा विषय परस्परांशी जोडू नये, असे बहुसंख्य कामगार नेत्यांचे म्हणणे आहे. त्यावरून दोन गट पडले आहेत. कामगार नेत्यांमध्ये असलेल्या गटबाजीचा फायदा व्यवस्थापनाकडून घेतला जात असून त्यामुळे आमचे नुकसान होत असल्याची भावना कामगारांमध्ये आहे.