टाटा मोटर्स कंपनीतील कामगारांच्या दिवाळी बोनसवरून निर्माण झालेला तिढा अजूनही सुटलेला नाही. परिणामी, कंपनी व्यवस्थापनाने जवळपास ६,५०० कामगारांच्या बँक खात्यात बोनस म्हणून प्रत्येकी ३० हजार ५०० रूपये जमा केले आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय जेव्हा होईल, त्यानंतर बोनसची उर्वरित रक्कम जमा केली जाणार आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या कार विभागातील (कार प्लांट) वेतनवाढ करार रखडला, त्यातूनच पुढे बोनसचा तिढा निर्माण झाला. दसऱ्यापर्यंत दिवाळी बोनस जाहीर होण्याची कंपनीची जुनी परंपरा यंदा खंडित झाली म्हणून कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. कंपनीच्या दसरा-खंडेनवमीच्या सामूहिक पूजेवर बहिष्कार टाकून कामगारांनी ही नाराजी व्यवस्थापनाला दाखवून दिली होती.
हेही वाचा : विश्लेषण : नागपूर ते गोवा केवळ ८-१० तासांत? ‘शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग’ कसा आहे?
कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात ३ मे २०२२ रोजी वेतनवाढ करार झाला, त्यानुसार दर तीन वर्षांनंतर होणारा करार यंदापासून दर चार वर्षानंतर होईल, असा बदल करण्यात आला. तो कामगारांना मान्य नाही. कामगारांचा विरोध असतानाही संघटना प्रतिनिधींनी तो मान्य केला. कंपनीतील इतर विभागांचा वेतनवाढ करार झाला, त्याचपद्धतीने कार विभागाचा करार झाला नाही. त्यावरून या विभागातील कामगारांमध्ये नाराजी होती. नेहमीप्रमाणे दसऱ्यापूर्वी बोनसची घोषणा झाली नाही म्हणून कार विभागापुरती मर्यादित असलेली ही नाराजी नंतर सर्वच कामगारांमध्ये पसरली. या नाराजीनाट्यामुळे टाटा मोटर्स कामगार संघटनेने कंपनी व्यवस्थापनाशी असहकार पुकारला आणि दसऱ्याच्या सामूहिक पूजेवर बहिष्कार घातला. याबाबतची माहिती मुंबईपर्यंत पोहोचल्याने कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वादात लक्ष घातले.
हेही वाचा : पिंपरी : दिवाळी बोनसवरून ‘टाटा’च्या कर्मचाऱ्यांचा पूजेवर बहिष्कार
कार विभागाचा वेतनवाढ करार झाल्याशिवाय दिवाळी बोनसवर चर्चा नको, अशी अट कामगार संघटनेचे अध्यक्ष व त्यांच्या समथर्कांनी व्यवस्थापनासमोर ठेवली. यावरून संघटनेत दोन गट पडले. वेतनवाढ करार व बोनसचा विषय परस्परांशी जोडू नये, असे काहींचे म्हणणे होते. यावरून बरेच दिवस तिढा आहे. तोडगा काढण्याचे प्रयत्न फोल ठरले. संघटनेतील गटबाजीवरून कामगारांमध्ये बरीच नाराजी आहे. या परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचे पाहून कंपनीने अखेर, २० ऑक्टोबरला निर्णय घेतला. त्यानुसार, २१ ऑक्टोबरला एकाच दिवशी कामगारांच्या खात्यात ३० हजार ५०० रूपये बोनसची रक्कम जमा करण्यात आली.
वर्षे – बोनसची रक्कम
२०२० – ३८, २००
२०२१ – ३८, ५००