टाटा मोटर्सच्या चिखलीतील ‘कार प्लांट’ शुक्रवारपासून म्हणजेच २६ ते ३१ जुलै दरम्यान सहा दिवस बंद राहणार आहे. औद्योगिक मंदीचा फटका बसल्याने कंपनी व्यवस्थापनाने ‘ब्लॉक क्लोजर’चा निर्णय घेतला आहे. मंदीमुळे कंपनीकडून मिळणाऱ्या एलबीटी उत्पन्नातही मोठय़ा प्रमाणात घट झाल्याने पिंपरी पालिकेलाही तूट सहन करावी लागते आहे.
टाटा मोटर्सच्या चिखली येथील कार प्लांटमध्ये इंडिका, इंडिगो गाडय़ांचे उत्पादन केले जाते. जवळपास तीन हजार कामगार असलेल्या या विभागाची दररोज १२०० मोटारींचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. मात्र, सद्य:स्थितीत जेमतेम २०० मोटारींचे उत्पादन होत आहे. मागणी नसल्याने उत्पादन कमी करावे लागत आहे. अशा परिस्थितीत कंपनीने ‘ब्लॉक क्लोजर’ चा निर्णय घेतला असून तशी नोटीस लावण्यात आली आहे. त्यानुसार २६ ते ३१ जुलै दरम्यान ‘कार प्लांट’ बंद राहणार आहे. या सहा दिवसांमध्ये एक रविवार आहे. उर्वरित पाच दिवसांसाठी कामगारांना अडीच दिवसांचा पगार व अडीच दिवसांची सुट्टी असे धोरण कंपनीने ठरवले आहे.
पिंपरी पालिकेला टाटा मोटर्स कंपनीकडून मोठय़ा प्रमाणात एलबीटीचे उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून औद्योगिक मंदीमुळे पालिकेलाही आर्थिक फटका बसतो आहे. महिन्याकाठी ३२ कोटी किंवा त्याहून अधिक उत्पन्न देणाऱ्या टाटा मोटर्सने मे महिन्यात २४ कोटी जून महिन्यात १९ कोटी एलबीटी भरला आहे.
ऑगस्टमध्येही चार दिवस बंद
जुलैच्या महिनाअखेरीस सहा दिवस ‘ब्लॉक क्लोजर’ जाहीर केल्यानंतर टाटा मोटर्सने पुढील ऑगस्ट महिन्यात १६ ते १९ या तारखांना पुन्हा काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
टाटा मोटर्सचा चिखलीतील ‘कार प्लांट’ आजपासून सहा दिवस बंद
टाटा मोटर्सच्या चिखलीतील ‘कार प्लांट’ शुक्रवारपासून म्हणजेच २६ ते ३१ जुलै दरम्यान सहा दिवस बंद राहणार आहे. औद्योगिक मंदीचा फटका बसल्याने कंपनी व्यवस्थापनाने ‘ब्लॉक क्लोजर’चा निर्णय घेतला आहे
आणखी वाचा
First published on: 26-07-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motor car plant in chikhali closed six days due to industrial depression