क्षयरोग किंवा एचआयव्हीवरील औषधे उपलब्ध न होणे, औषधांचा डोस पूर्ण करण्याबाबत जनजागृती नसणे, समाजाकडून मिळणारी वेगळी वागणूक अशा विविध गोष्टींवर चर्चा करण्यासाठी ‘टीबी फोरम’ या नावाने रुग्णांबरोबर वैद्यकीय तज्ज्ञ व समाजातील इतर क्षेत्रातील लोकही एका व्यासपीठावर येणार आहेत. ‘नेटवर्क ऑफ पुणे बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही’ या संस्थेतर्फे हे फोरम सुरू करण्यात आले असून सोमवारी त्याची पहिली बैठक होणार आहे.
‘महाराष्ट्र एडस् कंट्रोल सोसायटी’च्या ‘विहान’ या प्रकल्पाअंतर्गत एचआयव्हीबरोबरच क्षयरोगाविषयीही जनजागृती केली जाते. याचाच एक भाग म्हणून टीबी फोरममध्ये रुग्णांबरोबर खासगी वैद्यकीय व्यावसायिक, वकील, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील लोकांना आपल्या सूचना करुन त्यातून एकत्रितपणे उपाय शोधता येणार आहेत. या फोरमची बैठक दर तीन महिन्यांनी होणार असून पुढील तीन महिन्यांत त्यातील उपाय राबवण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती ‘नेटवर्क ऑफ पुणे बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही’चे अध्यक्ष संजय जाधव यांनी दिली. ते म्हणाले,‘नागरिक, तसेच टीबी व एचआयव्हीचे रुग्ण बैठकीस उपस्थित राहून आपल्या समस्या मांडू शकतील. क्षयरोगाच्या औषधांचा ठरलेला डोस पूर्ण न केल्यास क्षयरोग बळावू शकतो व त्याचे ‘मल्टी ड्रग रेझिस्टंट’ (एमडीआर) किंवा ‘एक्स्ट्रीम मल्टी ड्रग रेझिस्टंट’(एक्सडीआर) क्षयरोगात रुपांतर होण्याची शक्यता असते. तसेच एचआयव्हीची औषधेही मध्येच सोडून दिल्यास औषधांना अवरोध निर्माण होऊन रुग्णाला ‘सेकंड लाईन’ किंवा त्यापुढील औषधे घेण्याची वेळ येऊ शकते. असे न होता एचआयव्हीचा रुग्ण ‘फर्स्ट लाईन’ औषधांवरच राहील असे पाहणे गरजेचे आहे. या विषयांवर अधिक जनजागृती करायला हवी.’
समाजात अजूनही एचआयव्ही तसेच क्षयरोगाच्या रुग्णांविषयीचा ‘सोशल स्टिग्मा’ कायम असल्याचेही जाधव यांनी सांगितले. ‘अजूनही काही ठिकाणी या रुग्णांना दुय्यम वागणूक मिळते. या रोगांविषयीचा स्टिग्मा कमी करण्यासाठीही फोरमच्या माध्यमातून काही प्रयत्न करता येतील,’ असेही ते म्हणाले. अधिक माहितीसाठी रुग्ण वा नागरिकांनी ०२०-२६०५०१५० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा