‘टीडीएम’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येत आहे. एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण थिएटर न मिळाल्याने उद्विग्न होत चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी हा चित्रपट थांबवण्याचा निर्णय घेतला होता. ” त्यावेळी इतर सर्व चित्रपटांना महाराष्ट्रभर दीड-दीड हजार शो दिले होते. परंतु मलाच महाराष्ट्रात केवळ १२० शो दिले, हा एका षडयंत्राचा भाग असावा” अशी शंका कऱ्हाडे यांनी उपस्थित केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदमध्ये बोलत होते. सोबत चित्रपट अभिनेत्री, अभिनेता हे देखील सहभागी झाले होते. सध्या टीडीएम या चित्रपटाचे प्रमोशन वेगवेगळ्या महाविद्यालयात करण्यात येत आहे.
“२८ एप्रिल ला सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा ज्या गोष्टी घडल्या ती गळचेपी होती. ती संस्कृतीला काळिमा फासणारी गोष्ट घडली. आम्ही स्वतःहुन ‘टीडीएम’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले. एका बाजूला सर्व चित्रपटांना दीड -दीड हजार शो होते. तिथं मला महाराष्ट्रात केवळ १२० शो दिले. ही तफावत खूप वाईट होती. यावरून अस वाटतंय की हा एक माझ्या विरोधातील षडयंत्राचा भाग असावा” अशी प्रतिक्रिया भाऊराव कऱ्हाडे यांनी दिली आहे. “हे घडल्यानंतर सिनेमा करावी की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता, एवढं वाईट त्या गोष्टीचे वाटत होते, सिनेमा बनवण्यापेक्षा गावाकडे जाऊन काम करावं अशी मानसिकता झाली होती, मी संपलो अस वाटत होतं, पुन्हा सिनेमा करायचा नाही हे विचार डोक्यात डोकावत होते. परंतु महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी आम्हाला पाठिंबा दिला म्हणून पुन्हा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी मराठी चित्रपटासाठी नवीन नियमावली जाहीर केली. त्यात सलग चार आठवडे मराठी चित्रपट थेटरने दाखवावा असे म्हटले आहे. याचे मला समाधान वाटत आहे” अशी भावना कऱ्हाडे यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा… पुणे : सिगारेटला २० रुपये न दिल्याने आईला मारहाण
जेव्हा माझ्या चित्रपटाला थेटर मिळत नव्हते गळचेपी होत होती तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी चित्रपटाबद्दल भावना व्यक्त केल्या, त्यांचे मी आभार मानतो असं कऱ्हाडे म्हणाले. आता नऊ जूनला पुन्हा हा चित्रपट प्रदर्शित होत असून यावेळी २०० पेक्षा अधिक थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.