पुणे : गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अध्ययन अध्यापनाची पद्धत अधिक तंत्रस्नेही करण्यासाठी पुणे नॉलेज क्लस्टर आणि लिनोव्हा यांच्यातर्फे टिच विथ टेक हा उपक्रम सुरू करण्यात आला. सुरुवातीला पुण्यातील पाच शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबवला जाणार असून, जिल्हा परिषद शाळांतील साडेसातशे विद्यार्थी, अडीचशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याची योजना आहे.राज्यभरातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रशिक्षण कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
या उपक्रमाची माहिती प्रा. केंभारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. लेनोव्होचे टॅबलेट प्रमुख पंकज हराजाई, लिनोव्होच्या सीएसआर प्रमुख प्रतिमा हरिते, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. प्रिया नागराज, कार्यक्रम समन्वयक प्राची पासलकर आदी या वेळी उपस्थित होते. टिच विथ टेक कार्यक्रम सध्या पुण्यातील मॉडर्न हायस्कूल गणेशखिंड, पुणे विद्यापीठ हायस्कूल, श्री शिवाजी विद्या मंदिर, नूमवि मुलींची शाळा आणि बाबूराव घोलप शाळा या पाच शाळांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. तर पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी शंभरपेक्षा अधिक सत्र घेण्याचे नियोजन आहे.
टिच विथ टेक उपक्रमात विज्ञान आणि गणिताची ओळख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. नवीन तंत्रज्ञान वापरत अध्ययन आणि अध्यापनाची पद्धत अधिक समृद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी लेनोव्होने विद्यार्थ्यांना टॅब पुरवले आहेत, असेही प्रा. केंभावी यांनी सांगितले. हरजाई म्हणाले की, टिच विथ टेक उपक्रमासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांना स्मार्ट तंत्रज्ञान, किफायतशीर उपकरणे या उपक्रमातून आम्ही पुरवणार आहोत. सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हा प्रकल्प आहे.