श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com
प्रत्येक माणसाच्या अंगी कोणते ना कोणते गुण दडलेले असतात. आपल्यातील कलागुणांची ओळख आपलीच आपल्याला होण्यास जेव्हा अडचण येते तेव्हा ती कोणीतरी करून द्यावी लागते. आपल्या अंगी असणाऱ्या गुणांचा शोध लागल्यानंतर त्या गुणांना समृद्ध करण्यासाठी सुयोग्य मार्गदर्शकाचीदेखील गरज असते. वस्तीपातळीवरील मुलांचे गुण ओळखून त्या गुणांवर धूळ साचू नये म्हणून तसेच त्या गुणांना चमकविण्यासाठी सतत सज्ज आहेत, अमोल भीमराव जाधव हे हाडाचे शिक्षक. त्यांनी आजपर्यंत अनेकानेक मुलांचे व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे, तसेच त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सातत्याने प्रयत्न केले असून, त्यांचे कार्य अव्याहत सुरूच आहे.
शिक्षक हा नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटत असतो. शाळेतील ठरवून दिलेल्या तासांशिवायही आपल्याकडे जे आहे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तो झटत असतो. आपल्याकडे जे काही ज्ञान आहे, ते आपल्या विद्यार्थ्यांला देताना तो विद्यार्थी विद्यावान, चारित्र्यसंपन्न व्हावा यासाठी जे काही शिक्षक क्रियाशील असतात, त्यामध्ये अमोल भीमराव जाधव यांचे नाव घ्यावे लागेल. नाटय़लेखक, दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळवलेले जाधव सर शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी नाटय़प्रशिक्षण घेतले आहे, त्यांचे या प्रशिक्षणाबरोबरचे नाते तुटू नये म्हणून ते प्रयत्नशील आहेत. १० ते १२ वयोगटातील सुमारे पंधरा मुले-मुली अमोल यांच्याकडे आजच्या घडीला नाटय़प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाबरोबरच विविध लघुपट, मालिका, चित्रपट, नाटक यांच्यामधून त्यांनी आपले कसब दाखवले आहे.
जाधव हे नाटय़संस्कार कला अकादमी तसेच किलरेस्कर फाऊंडेशनच्या उपक्रमातदेखील सातत्याने सहभागी होत असतात. हरहुन्नरी आणि सामाजिक कार्याची जाण असलेल्या जाधव यांचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. अमोल यांना सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडून मिळाले. ऊसतोड कामगारांची मुले जाधव यांच्या घरी राहायला असायची. तसेच विविध मुलांच्या अडीअडचणी सोडविण्यात भीमराव जाधव कार्यरत असायचे.
‘राजा श्री शिवराय प्रतिष्ठान संस्थे’त प्राथमिक शिक्षक म्हणून अठरा वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या अमोल यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात उपयोगी पडतील असे अभिनयाचे धडेदेखील दिले. या विद्यार्थ्यांचे या नाटय़अभ्यासाबरोबर निर्माण झालेले नाते दृढ व्हावे, नाटय़प्रशिक्षणाबरोबर निर्माण झालेली नाळ तुटू नये म्हणून अमोल यांनी शाळेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘अभिजात पुणे’ ही संस्था २०११ साली स्थापन केली. शाळेत नाटकांची पुस्तके आणून नाटक बसवताना अनेक अडचणी यायच्या. प्रमाणित भाषेत नाटक सादर करणे त्या मुलांना अवघड जातंय हे लक्षात आल्यानंतर अमोल हे स्वत: नाटय़लेखक बनले आणि त्यांनी विविध नाटकांचे दिग्र्दशन करीत विद्यार्थ्यांकडून विविध नाटके सादर करण्यास सुरुवात केली. ही मुले आंतरशालेय नाटय़स्पर्धामधून नुसती यशस्वीच नाही तर बक्षिसेदेखील मिळवू लागली.
२००८ साली त्यांच्या संघाने राज्य नाटय़ स्पर्धेत प्रथम सहभाग नोंदविला होता. या नाटकांच्या सरावासाठी अर्थातच जागेची अडचण होती. ती दूर करीत असताना त्यांनी कोथरुड परिसरामध्ये जागा मिळवली.
बघता-बघता या वस्तीपातळीवरील मुलांच्या नाटकांचे विविध ठिकाणी प्रयोग होऊ लागले. या मुलांना विविध मालिका, चित्रपटांमधून भूमिकांसाठी विचारणा होऊ लागली आणि त्यांना भूमिकाही मिळू लागल्या. हळूहळू त्यांचे नीळकंठ शिंदे यांच्यासोबत नाटय़प्रशिक्षणाचे कार्य वारज्यातही सुरू झाले. तेथेही ते वस्तीपातळीतील मुलांसाठी शिबिरांचे आयोजन करू लागले. या मुलांना घेऊन एखादा प्रयोग करायचा झाल्यास त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा प्रश्न हा नेहमीच जाधव यांच्यासमोर उभा असे. पण त्याचे उत्तर या मुलांच्या माध्यमातूनच त्यांना मिळाले. या मुलांचे पालक मोलमजुरी करणारे, रिक्षाचालक असल्यामुळे आर्थिक चणचण जशी होती, तसेच मुलांच्या कार्यासंदर्भात पालकांना संवादातून पटवून देणे, अशी दुहेरी जबाबदारी होती. त्यावेळी या मुलांना भूमिकांचे मिळणारे मानधन आणि जाधव यांनी स्वत:च्या खिशातून काही पैसे घालून विविध स्पर्धामध्ये सहभाग घेण्याबरोबरच विविध प्रकल्प साकारण्यास सुरुवात केली.
दुसऱ्या बाजूला पालकांना अभिनय क्षेत्राची ओळख नसल्यामुळे एका बाजूला पालकांमध्ये उदासीनता असे तर काही पालकांना या क्षेत्रातील खडतर प्रवास माहीत नसल्यामुळे आपला मुलगा-मुलगी लवकरच ‘हिरो’ किंवा ‘हिरोईन’च होतील अशीही अपेक्षा असायची. त्यावेळी त्यांना नाटय़प्रशिक्षणाने व्यक्तिमत्त्व साकारण्यासाठी मदत होते, असे समजून द्यावे लागले. मुलांकडून एकही पैसा न घेता आठवडय़ातून दोन दिवस प्रशिक्षण देण्याबरोबरच या मुलांना कशा आणि कुठे संधी मिळतील यासाठी अमोल जाधव सतर्क असतात. केवळ अभिनयच नाही, तर या प्रशिक्षणात नाटय़अभिनयाशी संबंधित तांत्रिक बाबींचेदेखील प्रशिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यासाठी विनय जवळगीकर, सुधीर फडतरे, अॅड. अमर गायकवाड आदींसारखी मंडळी मुलांना शिकविण्यासाठी येतात. जाधव यांनी लेखन केलेल्या नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रभर होतात. अमोल यांना राज्य नाटय़ स्पर्धेत दिग्दर्शनाचा २००८, २०१२ आणि २०१४ या तीनही वर्षी सांस्कृतिक संचालनालयाचा पुरस्कार मिळालेला आहे.
जाधव यांचे विद्यार्थी ललित कला केंद्रातून अभिनय आणि भरतनाटय़म्मध्येही शिक्षण घेत असून अमोल यांनी सामाजिक विषयांवर वस्तीपातळीवरील मुलांना घेऊन लघुपटांची निर्मितीही स्वत:च्या खिशातून पैसे घालून केली आहे. त्यांच्या या कार्यात पत्नी मनीषा यांचेही सहकार्य असते. नाटकांची रंगभूषा, वेशभूषा यासाठी त्या अमोल यांना मदत करतात. याशिवाय शाळेतील सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या सहकार्यामुळेच नाटय़क्षेत्रात वेगळे कार्य करण्याची संधी मिळाल्याचे अमोल आवर्जून सांगतात.