पिंपरी चिंचवडमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. शिक्षकानेच दहा मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार करून देखील मुख्याध्यापकाने याकडे कानाडोळा केला आणि प्रकरण दडपलं. ही घटना चाकणच्या मैदनकरवाडीतील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे.
याप्रकरणी चार शिक्षकांचे निलंबन केलं आहे. बालाजी डोंबे असे नराधम शिक्षकाचे नाव आहे तर नितीन जाधव अस मुख्याध्यापकाचे नाव आहे. या दोघांसह आणखी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर माहिती अशी की, चाकणच्या मैदनकरवाडीतील जिल्हा परिषद शाळेत गेल्या काही वर्षांपासून मुलीचं लैंगिक शोषण सुरू आहे. हा सर्व प्रकरा नांदी फाउंडेशनच्या शिक्षिकांमुळे समोर आला.

नराधम शिक्षक बालाजी डोंबे हा शाळेत आणि खाजगी शिकवणी दरम्यान मुलींशी असभ्य वर्तन करत विनयभंग करायचा. या प्रकरणी मुलींनी अनेक वेळा मुख्याध्यापक नितीन जाधव यांना तक्रार केली मात्र त्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही.  मुली घाबरून कोठे बोलत नव्हत्या, शाळेत मुली आल्यानंतर त्या मुलांशी गप्पा मारत तेव्हा त्यांचा विडिओ किंवा फोटो शिक्षक बालाजी डोंबे काढायचा. तो फोटो मुलींना दाखवून तो धमकी द्यायचा की, तुमचं त्या मुलाशी प्रेम प्रकरण सुरू आहे. याची माहिती मी तुमच्या आई वडिलांना देणार असे म्हणून तो मुलींना घाबरवत असे. त्याच बरोबर काही मुलींची खाजगी शिकवणी नराधम शिक्षक हा त्याच्या घरी घ्यायचा तेव्हा त्यांच्याशी जवळीक साधण्यासाचा प्रयत्न करत होता.

या घटनेची माहिती जिल्हा परिषद शाळेत शिकण्यासाठी येणाऱ्या नांदी फाउंडेशनच्या शिक्षिकेन मुख्याध्यापकांना दिली मात्र त्यावेळी देखील नितीन जाधव याने कानाडोळा केला. अखेर याची माहिती वरिष्ठांना मिळाली आणि केंद्र प्रमुख विश्वास सोनवणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली याप्रकरणी मुख्यद्यापक नितीन जाधव आणि नराधम शिक्षक बालाजी डोंबे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आणखी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा चारही शिक्षकांचे निलंबन केलं आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.