विवाहाच्या आमिषाने एका शिक्षिकेची आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत शिक्षिकेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार सुशीलकुमार दुबे (रा. दिल्ली), विजया रेखीश्वर चेतिया (रा. आसाम) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिकेच्या पतीचे निधन झाले होते. पुनर्विवाह करण्यासाठी तिने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. संकेतस्थळाच्या माध्यमातून तिची गॅाडविन असे नाव सांगणाऱ्या आरोपीशी ओळख झाली होती. परदेशातील एका कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी त्याने केली होती.

त्यानंतर लंडनहून भारतात येणार असल्याची बतावणी गॅाडविनने केली होती. दिल्ली विमानतळावर उतरलो असून माझ्याकडे मोठ्या प्रमाणावर परदेशी चलन आहे. तातडीने भारतीय चलन लागणार आहे, अशी बतावणी त्याने केली. त्यानंतर गॅाडविनने शिक्षिकेला बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. आरोपी सुशीलकुमार दुबे आणि विजया चेतिया यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. पैसे जमा करण्यात आल्यानंतर तिने पुन्हा गॅाडविनशी संपर्क साधला. तेव्हा त्याचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले.

फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तिने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जाची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर संबंधित गुन्हा तपासासाठी कोंढवा पोलिसांकडे सोपविण्यात आला. प्राथमिक तपासात बँक खाते दुबे आणि चेतिया यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे तपास करत आहेत.

Story img Loader