पिंपरी : Shikshak Din 2023 History Significance in Marathi महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील एक हजार २३५ शिक्षकांना शिक्षक दिनाची भेट मिळाली आहे. या शिक्षकांना धन्वंतरी स्वास्थ योजना लागू करण्याचा निर्णय आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला. यामुळे शिक्षक संघटनांसह शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने शिक्षण दिनाच्या दिवशी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळेतील शिक्षकांना धन्वंतरी योजना लागू करण्याचा निर्णय आयुक्त सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी घेतला. महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी धन्वंतरी स्वास्थ योजना १ सप्टेंबर २०१५ पासून सुरू करण्यात आली. योजना सुरू झाल्यानंतर कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक धन्वंतरी योजनेच्या रचने (पॅनल)वरील रूग्णालयांमध्ये उपचार घेतात.
हेही वाचा >>> रेल्वेसाठी साखरेवरील निर्यात निर्बंध ‘कडू’; पण नेमकं कारण काय?
या योजनेमध्ये महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा समावेश होता; परंतु १०५ प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा समावेश नव्हता. या शिक्षकांचा समावेश करण्याची शिक्षकांसह शिक्षक संघटनांची मागणी होती. त्यासाठी निवेदने, आंदोलनही करण्यात आली. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून एक हजार २३५ शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
दरमहा ३०० रूपये स्वहिस्सा भरावा लागणार
शिक्षकांना धन्वंतरी योजनेसाठी दरमहा ३०० रूपये स्वहिस्सा आणि सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना दरमहा १५० रूपये स्वहिस्सा जमा करावा लागणार आहे. हे पैसे त्यांच्या वेतनातून अथवा पेन्शनमधून कपात केले जाणार आहेत. जमा होणाऱ्या हिश्श्याच्या दुप्पट रक्कम महापालिका धन्वंतरी निधीत जमा करते.