पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली असून, लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा आयोजित केली जाते. त्यात मराठी, इंग्रजी, उर्दू अशा वेगवेगळ्या माध्यमांच्या परीक्षा संगणकीय पद्धतीने घेण्यात अनेक तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याने टीईटी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव परीक्षा परिषदेने राज्य शासनाला सादर केला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ऑफलाइन किंवा प्रत्यक्ष लेखी परीक्षेचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. ऑफलाइन पद्धतीने परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे : प्राणिसंग्रहालयातून पसार झालेल्या बिबट्याचा ठावठिकाणा लागेना! अठ्ठेचाळीस तासानंतरही शोध घेण्यात अपयश

राज्यात शिक्षकांच्या ३० हजार पदांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ११ हजार पदांची भरती करण्यात आली आहे, तर उर्वरित रिक्त पदांवर येत्या काळात भरती होणार आहे. टीईटी परीक्षा वर्षातून दोनदा होणे अपेक्षित असते. त्यामुळे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचे टीईटी कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.

Story img Loader