पुणे : राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेतील रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. काही जिल्हा परिषदांनी पवित्र संकेतस्थळावर पदभरतीची जाहिरात दिली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत १२ हजार पदांची जाहिरात देण्यात आली आहे. १५ जानेवारीपर्यंत शिक्षक भरतीचे खरे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली आहे.
राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांचा ३० हजार पदांवर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात रिक्त असलेल्या पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. बिंदूनामावली तपासणीवर आक्षेप नोंदवण्यात आल्याने १० टक्के जागा बाजूला ठेवून ७० टक्के पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद, नगर परिषद आणि छोट्या स्थानिक संस्थांच्या बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता काही मोठ्या खासगी संस्थाच्या बिंदुनामावलीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १० दिवसांमध्ये संबंधित संस्थांची बिंदुवामावलीची प्रक्रिया पूर्ण करून त्या संस्थाच्या जाहिराती प्रसिध्द होतील. त्यानंतरच यंदा नेमक्या किती पदांवर शिक्षकांची भरती होणार याचे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा : पुण्यातील समाविष्ट गावांमधील शाळांसाठी शिक्षक भरती, रिक्त ३५५ जागांची भरती प्रक्रिया सुरू
पवित्र संकेतस्थळावर शिक्षक भरतीसाठी जाहिरात देण्याच्या सूचना दिल्यानंतर आता जाहिराती येण्यास सुरुवात झाली आहे. जाहिराती आलेल्या जिल्हापरीषदांमध्ये सध्या इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना झुकते माप देण्यात आले असल्याचा आरोप शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी केला आहे. दरम्यान, आत्तापर्यंत काहीच जिल्हा परिषदांच्या जाहिराती आल्या आहेत. आणखी जिल्हा परिषदांच्या जाहिराती येणार आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान संधी देण्यात येणार आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.