६ जुलै ते २३ ऑगस्टदरम्यान नोंदणी करण्याचे आवाहन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यभरातील शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेले पवित्र संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले. शिक्षक भरतीसाठीची अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी दिलेल्या, शिक्षक भरतीसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना ६ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान नोंदणी करता येणार असून, बहुप्रतीक्षित नोंदणी प्रक्रिया कार्यान्वित होत असल्याने राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

पवित्र संकेतस्थळाच्या माध्यमातून शिक्षक भरती केली जाणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर शिक्षकांची अभियोग्यता चाचणी घेण्यात आली, संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष नोंदणी करण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. त्यानुसार शालेय विभागाच्या संकेतस्थळावर पवित्र संकेतस्थळाचा दुवा उपलब्ध करून देण्यात आला आहे. अभियोग्यता चाचणी दिलेल्या उमेदवारांना https://edustaff.maharashtra.gov.in/pavitra/users/login या दुव्यावर परीक्षा क्रमांकानुसार माहिती भरता येईल. परीक्षा क्रमांकानुसार नोंदणी करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. उमेदवारांना वेळापत्रकात दिलेल्या तारखांनुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे.

तांत्रिक अडचणी उद्भवू नयेत

शिक्षणमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे बहुप्रतीक्षित ऑनलाइन शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संकेतस्थळावर प्रत्यक्ष नोंदणीची संधी उपलब्ध झाली असली, तरी आता या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी उद्भवू होऊ नयेत, तसेच शिक्षक भरतीचा कार्यक्रमही पारदर्शक पद्धतीने राबवण्यात यावा, अशी अपेक्षाही उमेदवारांनी व्यक्त केली.

परीक्षा क्रमांकानुसार नोंदणीसाठी वेळापत्रक

  • ६ ते ८ जुलै — १ ते ५ हजार
  • ९ ते ११ जुलै — ५ हजार ते १५ हजार
  • १२ ते १५ जुलै — १५ हजार ते ३० हजार
  • १६ ते १८ जुलै — ३० हजार ते ४५ हजार
  • १९ ते २२ जुलै — ४५ हजार ते ६० हजार
  • २३ ते २५ जुलै — ६० हजार ते ७५ हजार
  • २६ ते २९ जुलै — ७५ हजार ते ९० हजार
  • ३० जुलै ते १ ऑगस्ट— ९० हजार ते १ लाख ५ हजार
  • २ ते १२ ऑगस्ट — १ लाख ५ हजार ते १ लाख ५० हजार
  • १३ ते १५ ऑगस्ट —१ लाख ५० हजार ते १ लाख ६५ हजार
  • १६ ते १९ ऑगस्ट — १ लाख ६५ हजार ते १ लाख ८० हजार
  • २० ते २३ ऑगस्ट —१ लाख ८० हजार ते १ लाख ९९ हजार १४३
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher recruitment process