पुणे : राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीला चार वर्षांत मुहूर्तच मिळालेला नाही. यंदा फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र परीक्षेची काहीच चिन्हे दिसत नसल्याने परीक्षा कधी होणार, होणार की नाही या बाबत राज्यभरातील उमेदवारांमध्ये संभ्रम आहे.

राज्यातील खासगी, अनुदानित शाळांतील शिक्षकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला. त्यासाठी पवित्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली. सहा महिन्यांतून एकदा किंवा दरवर्षी ही परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार डिसेंबर २०१७ मध्ये महाआयटी आणि राज्य परीक्षा परिषद यांच्यातर्फे ही परीक्षा घेण्यात आली. त्यानंतरच्या चार वर्षांत ही परीक्षा एकदाही झालेली नाही. यंदा फेब्रुवारीमध्ये परीक्षा आयोजित करण्यासंदर्भातील सूचना तत्कालीन शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. ऑफलाइन पद्धतीने दोनशे गुणांची परीक्षा घेतली जाणार होती. मात्र परीक्षा घेण्यासाठी यंत्रणेची निवड प्रक्रिया अद्याप झालेली नसल्याने परीक्षा होणार की नाही, या बाबत स्पष्टता नसल्याचे दिसून येत आहे.

राज्यात लाखो बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली आहे. राज्यात शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्य शासनाने आता अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घ्यायला हवी. गेल्या चार वर्षांत केवळ एकदाच ही परीक्षा झाली. शिक्षकांच्या जागा रिक्त असूनही आता कंत्राटी पद्धतीने भरती केली जात असल्याने उमेदवारांचे नुकसान होत आहे. तसेच शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याचा विचार करून तातडीने या परीक्षेचे आयोजन करायला हवे, असे डीटीएट बीएड स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितले.

अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ही परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे परीक्षा कधी घ्यायची, या बाबतचा निर्णय शासन स्तरावरून होणे अपेक्षित आहे.  – शरद गोसावी, प्रभारी अध्यक्ष, परीक्षा परिषद

Story img Loader