पुणे : राज्यात पवित्र प्रणालीद्वारे सुरू करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेने वेग घेतला आहे. शिक्षक पदभरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र प्र‌णालीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ घेतली. चाचणीसाठी नोंदणी केलेल्या २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांपैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली. आतापर्यंत १ लाख ६२ हजार ५६२ उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठीची स्व प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेदवारांच्या स्व-प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद, नागपूर खंडपीठाने निर्णय दिलेल्या प्रकरणात कार्यवाही सुरू आहे. २०२३च्या शिक्षक पदभरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा १६ ऑक्टोबरपासून पवित्र प्रणालीवर सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राज्यातील २३ जिल्हा परिषदांची बिंदूनामावली प्रमाणित झालेली आहे. उर्वरित जिल्हा परिषदांची प्रमाणित बिंदूनामावली लवकरच प्राप्त होईल. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी व्यवस्थापनांनी बिंदू नामावली अद्ययावत करणे आवश्यक आहे, असे मांढरे यांनी स्पष्ट केले. शिक्षक पदभरतीची जाहिरात देण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>“नवरात्रात काही तासांसाठी खंडोबा मंदिराचा गाभारा ग्रामस्थांच्या दर्शनासाठी खुला करा”, हेमंत सोनवणेंची मागणी

२०१९च्या भरतीतील रिक्त पदांवरही शिफारस

२०१९ मधील शिक्षक पदभरती प्रक्रियेतील अपात्र, गैरहजर, रूजू न झालेल्या, तसेच माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी गुणवत्तेनुसार उर्वरित पात्र उमेदवारांतून शिफारस केली जाणार आहे. त्यासाठी पवित्र संकेतस्थळावर रिक्त पदांची माहिती संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना २० ऑक्टोबरपासून देण्यात येणार आहे. त्यानंतर पोर्टल स्व प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या उमेदवारांकडून १० नोव्हेंबरपासून प्राधान्यक्रम घेऊन उर्वरित पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. २०१९च्या जाहिरातीपैकी १९६ व्यवस्थापनांना मुलाखतीसह पदभरतीसाठी उमेदवार उपलब्ध करून देण्यात आलेले होते. त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पूर्ण झाल्याने त्यांना निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संकेतस्थळावर मुलाखतीच्या निकालाची नोंद करणे, शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.