पुणे जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. मावळातील सर्वच नद्या, ओढ्याला पूर आला आहे. मावळमधील शिवली- भडवली या ओढ्याला पूर आल्याने शाळेतील विदयार्थ्यांना मानवी साखळी करून शिक्षक ज्ञानेश्वर शिवणेकर यांनी पालकांच्या मदतीने पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका केली आहे. गुरू पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरू आणि शिष्यांच हे नातं पाहायला मिळालं. हे सर्व विद्यार्थी छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतात. 

शिवणे येथे असलेल्या छत्रपती शिवाजी विद्यालयात आजूबाजूच्या आठ गावातील जवळपास शंभर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. मंगळवारी सकाळी रिमझिम पाऊस होता, त्यामुळं विद्यार्थी शाळेत येऊ शकले. परंतु, दुपारच्या सुमारास अचानक धो- धो पाऊस झाला, हे पाहून विदयार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. तोपर्यंत शिवली- भडवली ओढ्याला पूर आला होता. रस्त्यावर गुडगाभर पाणी आले होते असं शिक्षक ज्ञानेश्वर शिवणेकर यांनी सांगितलं. मुलांना भीती वाटत असल्याने आणि काही दुर्घटना होऊ नये म्हणून शिवणेकर यांनी इतर काही पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची मानवी साखळी करून पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका केली. रस्ता अरुंद असल्याने दरवर्षी अशा प्रकारच्या घटनेला सामोरे जावं लागत आहे. रस्ता अरुंद आहे तो उंच करावा किंवा पूल बांधावा असं आवाहन शिक्षक ज्ञानेश्वर शिवणेकर यांनी लोकसत्ता ऑनलाइन माध्यमातून लोकप्रतिनिधींना केलं आहे.

Story img Loader