पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याअंतर्गत (स्क्वॉफ) स्वयंमूल्यांकनाची माहिती भरण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. मात्र, या स्वयंमूल्यांकनातील १२८ मानकांची माहिती भरणे आणि छायाचित्रे, चित्रफिती जोडण्याच्या कामात शिक्षकांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

एससीईआरटीने स्थापन केलेल्या राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षातर्फे राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात शाळांनी स्वयंमूल्यांकन करणे अपेक्षित आहे. त्यानुसार या प्रक्रियेसाठीचा ऑनलाइन दुवा उपलब्ध करून देत शाळांना स्वयंमूल्यांकनासाठीची माहिती भरणे, छायाचित्रे, चित्रफिती जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांच्या परिपत्रकानुसार आतापर्यंत राज्यातील सर्व शाळांची ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून, स्वयंमूल्यांकनासाठी आता १० एप्रिलची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयंमूल्यांकन नोंदणी आणि पूर्तता पूर्ण करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष विजय कोंबे म्हणाले, स्वयंमूल्यांकनामध्ये १२८ मानके निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक मानकाची माहिती भरणे, त्यासाठी आवश्यक छायाचित्रे, चित्रफिती जोडणे बंधनकारक आहे. त्यासाठी आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. इतके करून काय साध्य होणार हा प्रश्न आहे. कारण, या पूर्वीच अशा प्रकारचा शाळा सिद्धी हा उपक्रम राबवण्यात आला होता. त्याचे पुढे काही झाले नाही. मुख्यमंत्री माझी शाळा अभियानातही माहिती मागवली जाते. मात्र चांगली कामगिरी करणाऱ्या शाळांना किमान पारितोषिके तरी मिळतात. शाळा स्तरावर पुरेसे मनुष्यबळ नाही, सुविधा नाहीत. छायाचित्रे किती काळ जपून ठेवायची? केवळ या मूल्यांकनासाठी जुनी छायाचित्रे शोधून माहिती भरावी लागत आहे. राज्यात शिकणे, शिकवणे सोडून बाकी सारे काही होत आहे, असे मतही त्यांनी मांडले.

स्वयंमूल्यांकनातील माहिती या पूर्वी दिलेली आहे. मात्र आता ती पुन्हा द्यावी लागणार आहे. हे काम ऑनलाइन असल्याने त्यासाठी सर्वच शिक्षक प्रशिक्षित नाहीत. त्याशिवाय परीक्षांचे दिवस असताना त्यात हेही काम करावे लागत असल्याचे दमछाक होत असल्याचे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र या शिक्षक गटाचे संयोजक विक्रम अडसूळ यांनी सांगितले.