पिंपरी महापालिकेच्या निवडणूक विभागाचा कणा समजले जाणारे प्रशासन अधिकारी बाबा बागल प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतून शनिवारी निवृत्त होत आहेत. पालिकेच्या आठ निवडणुकांची मुख्य जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या बागल यांनी चार विधानसभा व चार लोकसभा निवडणुकीतही समन्वयकाची भूमिका चोखपणे बजावली.
पालिकेचे निवडणूक मॉडेल राज्यभर राबवण्यात आले, त्याचे संपूर्ण श्रेय त्यांच्याकडे जाते. वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरी महत्त्वाची ठरते, अशी भावना त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
पालिकेत ३१ मे १९७५ ला रुजू झालेल्या बागलांनी शिक्षण, करसंकलन, जकात, क्रीडा, जनगणना, भूमी जिंदगी, निवडणूक विभागात काम केले. १९९० ला ते निवडणूक विभागात आले. तेव्हापासून गेल्या २२ वर्षांत झालेल्या सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. निवडणूकपूर्व प्रशिक्षण, प्रभागांची रचना, मतदार याद्यांची विभागणी, आचारसंहिता, न्यायप्रविष्ट प्रकरणे, निकालपत्रे यांसारखी अनेक कामांची जबाबदारी बागलांनी लीलया सांभाळली होती. वि. का. दाते, श्रीनिवास पाटील, अनिल डिग्गीकर, भा. ई. नगराळे, गणेश ठाकूर, रवींद्र सुर्वे, दिलीप बंड, आशिष शर्मा अशा अनेक आयुक्तासमवेत त्यांनी काम केले, त्या सर्वानीच बागल यांच्या कौशल्याचे कौतुकच केले. २०१२ च्या पालिका निवडणुकीत १८० प्रकारच्या विविध अर्जासाठी एकच पॅटर्न त्यांनी आखून दिला, तो खूपच यशस्वी ठरला. राज्य निवडणूक आयोगाने अन्य महापालिकेत तो वापरला. आरक्षण सोडतीचे नियोजन त्यांनी वैशिष्टय़पूर्ण केल्याने त्याचेही कौतुक झाले. निवडणुकीचे अधिकाधिक काम संगणक पद्धतीने कमी मनुष्यबळात करून आर्थिक बचत केली. निवडणूक प्रक्रियेचे २० भाग तयार करून पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यात सामावून घेण्याचे काम त्यांच्याच पुढाकाराने झाले. त्यांच्या निवडणूक शाखेतील कामगिरीचे कौतुक राज्य निवडणूक आयोगाने केले तसेच दोन वेळा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन पालिकेनेही केले. यासंदर्भात, बागल म्हणाले, संस्था पगार देते, त्याचे भान ठेवून सर्वतोपरी योगदान देण्याची भावना कर्मचाऱ्यांनी ठेवली, पाहिजे. वैयक्तिक कामांपेक्षा सांघिक कामगिरी असावी, एकजूट ठेवल्यास निश्चितपणे यशस्वी काम होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा