कोणताही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी ‘टीम वर्क’ला सर्वाधिक महत्त्व असते. त्याशिवाय ध्येय गाठता येत नाही. आपल्याकडे नेमकी याच गोष्टीची कमतरता जाणवते. दुसऱ्या देशांवर विसंबून न राहता एकत्रितपणे आपण आपले तंत्र विकसित केले पाहिजे, असे विचार पुणे मेट्रो प्रकल्पाचे विशेष अधिकारी व स्थापत्यशास्त्रातील तज्ज्ञ शशिकांत लिमये यांनी व्यक्त केले.
अल्युम्नी असोसिएशन ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या वतीने बांधकाम तज्ज्ञ एस. बी. जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा १९ वा पुरस्कार लिमये यांना शनिवारी देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. इंडियन रेल्वे सव्र्हिसेस ऑफ इंजिनिअिरग, यूएनडीपी प्रोजेक्ट्स, कोकण रेल्वे कार्पोरेशन, इंग्लडमधील ब्रिजेस अॅण्ड स्ट्रक्चर या संस्थांसह अमेरिका व इतर देशांतील अनुभव असलेले लिमये यांना स्थापत्यशास्त्रातील रचना व उत्कृष्ट पूल बांधणीसाठी हा पुरस्कार देण्यात आला. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपसंचालक बी. बी. अहुजा, असोसिएशनचे अध्यक्ष श्रीपाद मिराशी, मानद सचिव पी. व्ही. मांडके, संयोजक डॉ. पी. एम. रावळ त्याचप्रमाणे बी. एन. शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.
लिमये यांनी त्यांच्या भाषणामध्ये कोकण रेल्वेसाठी उभारण्यात आलेले पूल व बोगद्यांसह देशात त्यांच्या सहभागातून उभारण्यात आलेल्या विविध पुलांची माहिती दिली. या प्रकल्पांसाठी वापरलेले तंत्रज्ञानही त्यांनी उलगडून दाखविले. ऐनवेळी आलेल्या अडचणींवर मात करून प्रकल्प यशस्वी करण्याची किमया कशी साकारता येते, याबाबतची उदाहारणे त्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसमोर ठेवली. पुस्तकातून नव्हे, तर ते प्रत्यक्ष कामातून येणारे अभियांत्रिकीचे ज्ञान महत्त्वाचे आहे. जगातील कोणत्याही प्रकल्पाशी स्पर्धा करण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे. मात्र त्यासाठी योग्य ‘टीम वर्क’ असायला हवे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.