पुणे : राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील जागांसाठी पवित्र संकेतस्थळाद्वारे उमेदवारांचे पसंतीक्रम नोंदवण्यात येत आहेत. मात्र या संकेतस्थळाला तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार उमेदवारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान संकेतस्थळाला येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पसंतीक्रम नोंदवण्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला.
राज्यातील हजारो उमेदवारांचे शिक्षक भरतीकडे लक्ष लागले आहे. या भरती प्रक्रियेत नुकतीच एकूण २१ हजार ६७८ पदांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. पवित्र संकेतस्थळावर जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ३४ जिल्हा परिषदांतील १२ हजार ५२२ पदे, १८ महापालिकांतील दोन हजार ९५१ पदे, नगरपालिकांतील ४७७, नगर परिषदांतील एक हजार १२३, खासगी अनुदानित पाच हजार ७२८ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ जागांवर, तर मुलाखतीसह चार हजार ८७९ जागांवर भरती केली जाणार आहे. उमेदवारांना पसंतीक्रम नमूद करण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पदभरतीसाठी उमेदवारांची पसंतीक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
हेही वाचा >>>पुणे: आळंदीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, नेमका स्फोट कशाचा?
संकेतस्थळाला येत असलेल्या अडचणींबाबत डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशनचे संतोष मगर म्हणाले, की संकेतस्थळाला अडचणी येत आहेत. अनेकदा ‘एरर’ दाखवली जात आहे. त्यामुळे पसंतीक्रम नोंदवताना उमेदवार गोंधळून गेले आहेत. या अडचणींच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने मदत केंद्र सुरू करावे, तसेच अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी.
२ लाख १७ हजार अभियोग्यताधारकांपैकी जवळपास १ लाख १८ हजार अभियोग्यताधारकांनी गेल्या दोन दिवसांत पसंतीक्रम नमूद केले आहेत. एकावेळी जवळपास ७५ हजार वापरकर्त्यांचे लॉगिन होत असल्यामुळे संकेतस्थळ काही प्रमाणात संथ होत आहे. सर्वांना पसंतीक्रम नोंदवता येण्यासाठी अधिक वेळ मिळण्याच्या दृष्टीने १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. – सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त