लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील ३९० तंत्रनिकेतनांतील (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून (२९ मे) सुरू होणार आहे. १ लाख ५ हजार जागांसाठी विद्यार्थ्यांना २५ जूनपर्यंत अर्ज भरता येणार असून, अंतिम गुणवत्ता यादी २ जुलैला जाहीर केली जाणार आहे. प्रवेशासाठी तीन फेऱ्या राबवल्या जाणार आहेत.
तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. गेल्या काही वर्षांत दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. कमी कालावधीत तंत्रशिक्षण घेऊन नोकरी किंवा स्वयंरोजगारासाठी पदविका अभ्यासक्रमाला पसंती दिली जाते. स्थापत्य, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, संगणक, रसायन या मुख्य शाखांमध्ये अन्य उपशाखा आहेत. विद्यार्थी त्यांच्या पसंतीचा अभ्यासक्रम निवडून प्रवेश घेऊ शकतात. तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार नोंदणी आणि अर्ज करणे, कागदपत्र पडताळणी करण्यासाठी २९ मे ते २५ जूनची मुदत देण्यात आली आहे. २७ जूनला प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. २८ ते ३० जून या कालावधीत गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवता येतील. तर अंतिम गुणवत्ता यादी २ जुलैला प्रदर्शित हकेली जाणार आहे.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तीन फेऱ्या होणार आहेत. छाननी प्रक्रियेव्यतिरिक्त ई छाननी प्रक्रियाही राबवली जाणार आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३१६ सुविधा केंद्रे, मार्गदर्शनसाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वय अधिकारी उपलब्ध आहेत. पदविका प्रवेशासंदर्भातील सविस्तर माहिती https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतील बदल
- सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जागा आरक्षित
- थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमात नोकरदार विद्यार्थ्यांची स्वतंत्र तुकडी
- थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमाची शाखा बारावीच्या विषयानुसार निवडण्याची मुभा